धुळे : मुख्य अंकातील पानासाठी....
--
फोटो क्रमांक : 32477
मुंबई : सिंचन प्रकल्पांच्या कामांच्या आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. शेजारी पालकमंत्री जयकुमार रावल, चंद्रकांत रघुवंशी, आमश्या पाडवी, राम भदाणे आदी.
--
प्रकाशा- बुराई योजनेला तातडीने निधी द्या
--
पालकमंत्री रावल यांची जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या प्रकाशा-बुराई उपसा जलसिंचन योजनेला गती देऊन केंद्र सरकारच्या निधीच्या यादीत समावेश करण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.
१९९९ पासून ठेकेदार व संबंधित यंत्रणेकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल मंत्री रावल यांनी नाराजी व्यक्त केली. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला असून केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील सकारात्मक आहेत. त्यामुळे या योजनेचा केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत समावेश करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विनाविलंब कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले. या योजनेमुळे शिंदखेडा, नंदुरबार आणि साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळणार आहे. तसेच, सुलवाडे- जामफळ उपसा जलसिंचन योजनेची उर्वरित सुमारे ३०० मीटर मुख्य जलवाहिनी जोडणे आणि १३३ केव्ही विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण करून १५ डिसेंबरपर्यंत जामफळ धरणात पाणी पोहोचविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय साक्री तालुक्यातील फोफरे, घाणेगावसह माळमाथा परिसरातील १३ ते १४ गावांना फायदा होण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून हामडा नाल्यात पाणी सोडण्याची मागणीही करण्यात आली. बैठकीला आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, आमदार राम भदाणे, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेश मोरे, अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नियमित लक्ष ठेवावे, असे निर्देश जलसंपदा मंत्री महाजन यांनी दिले.