उत्कर्ष कलाविष्कारला प्रयोगकला सन्मान

उत्कर्ष कलाविष्कारला प्रयोगकला सन्मान
Published on: 
ॲंकर ------- उत्कर्ष कलाविष्कार संस्थेला ‘प्रयोगकला’ सन्मान जाहीर ----- भुसावळच्या नाट्यक्षेत्रात आनंद; पिंपरी-चिंचवड येथे मंगळवारी पुरस्काराचे वितरण सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता.१७ : येथील ‘उत्कर्ष कलाविष्कार’ या नाट्यसंस्थेला राज्यस्तरीय प्रायोगिक नाटय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘प्रयोगकला सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. थिएटर वर्कशॉप कंपनीने उत्कर्षचे अध्यक्ष अनिल कोष्टी यांना या निवडीबाबत पत्राद्वारे कळविले आहे. पुरस्कार वितरण येत्या मंगळवारी (ता.२४) पिंपरी-चिंचवड येथे होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ या नाट्यप्रयोगकला महोत्सवांतर्गत उत्कर्ष कलाविष्कार संस्थेला हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. गेल्या ३५ वर्षांपासून प्रायोगिक नाट्य कला क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून नाट्यकला, सांस्कृतिक चळवळ व कलाविष्काराच्या माध्यमातून समाजमन समृद्ध करण्यासाठी संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे. आतापर्यंत संस्थेने ३३ नाटकांची निर्मिती केली आहे. राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत अनेक पारितोषिके पटकावले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून खानदेश नाट्य महोत्सवाचे सातत्याने आयोजन करणारी अलीकडच्या काळातील महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. आतापर्यंत मिळालेला सन्मान दोन वर्षांपूर्वी नाट्यक्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या मानसरंग महोत्सवात संस्थेचा सन्मान करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे यांच्या वतीने ‘रवींद्र दामले उत्कृष्ट प्रायोगिक संस्था’ या महत्वाच्या पुरस्काराने संस्थेस सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेच्या या प्रदीर्घ कला प्रवासाची, रंगकर्मी अनिल कोष्टी व उत्कर्षाच्या सर्वच रंगकर्मींच्या नाट्य क्षेत्रातील अविरत, समर्पित भावनेने केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महोत्सवाचा उद्देश पिंपरी-चिंचवड परिसरात २०२३पासून ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ या नाट्यप्रयोगकला महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रायोगिक नाट्यसंस्था, पारंपरिक लोककला सादर करणाऱ्या संस्था, विविध सांस्कृतिक संस्थांना मंच उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. या महोत्सवाचा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (ता.२४) सायंकाळी पाचला ग. दि. माडगूळकर नाट्यगृह प्राधिकरण (निगडी) पिंपरी-चिंचवड येथे होणार आहे. कलावंतांना ऊर्जा मिळणार उत्कर्ष कलाविष्कार संस्थेला हा सन्मान जाहीर झाल्याने भुसावळच्या सांस्कृतिक व नाट्य वर्तुळात आनंद व्यक्त होत आहे. समाजाच्या विविध स्तरांतून संस्थेच्या कलावंतांचे अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या कलात्मक वाटचालीस नवी प्रेरणा व कलावंतांना ऊर्जा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.