(बातमी आवश्यक)
लोगो : सकाळ एनआयई
.........
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ज्ञानभेट
‘सकाळ-एनआयई’ आणि मनपाचा उपक्रम; आज अंक वितरण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून त्यांचे ज्ञानविश्व समृद्ध व्हावे आणि शालेय जीवनातच वाचनाची सवय लागावी, या उद्देशाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘सकाळ एनआयई ’ आणि जळगाव महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने विशेष अंक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. १५) दुपारी बाराला चौबे मार्केट परिसरातील शनिपेठ येथील पीएम श्री मनपा केंद्र शाळा क्रमांक २ (चौबे शाळा) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त आदित्य जिवने, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमासाठी नोबेल फाउंडेशन आणि शारदा बुक डेपो, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. ‘सकाळ एनआयई’ आणि महापालिकेच्या संयुक्त पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. वाचनातून ज्ञान आणि ज्ञानातून प्रगती साधण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
चौकट
वाचनातून विद्यार्थ्यांची विचारक्षमता वाढणार
एनआयई हे वर्तमानपत्र हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून विद्यार्थ्यांसाठी ज्ञान मिळविण्याचे प्रभावी साधन आहे. देश-विदेशातील घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा, सामान्यज्ञान आणि शैक्षणिक विषयांची माहिती विद्यार्थ्यांना या वर्तमानपत्रातून मिळणार आहे. त्यामुळे त्यांची आकलनशक्ती वाढण्यासोबतच विचार करण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होईल. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची आवड देखील निर्माण होणार आहे.