सिन्नर- तालुक्यातील वडगाव पिंगळा हे गाव शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा अंगीकार करणारे. गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास इथले शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती पिकवत होते. मात्र, अटल भूजल योजनेची या गावात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्षाकाठी आठ ते दहा लाखांच्या घरात पोहोचले आहे. इथल्या शेतकऱ्यांनी जल व्यवस्थापनाचे महत्त्व जाणल्याचा हा परिणाम म्हणावा लागेल.