पान-३ अँकर
फोटो ओळी : 05166
वडगाव ः ओवाडी नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा उभारताना भगवान गोरडे, नीलेश बोंद्रे, अनिल बच्छाव, मनीषा पवार व सावता शेतकरी सेंद्रिय गटाचे सदस्य.
वडगावला उभारला श्रमदानातून वनराई बंधारा
जलसंधारणासाठी सेंद्रिय गटाचा पुढाकार
अंबासन, ता. ९ : वडगाव (ता. मालेगाव) येथील सावता शेतकरी सेंद्रिय गटाच्या सदस्यांनी सत्यमेव जयते फार्मर कप २०२६ स्पर्धेच्या माध्यमातून ओवाडी नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा उभारला. पावसाचे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक निचरा व्हावा, तसेच भूजल पातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने शेतकऱ्यांनी हा उपक्रम राबविला.
यंदाची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन जलसंधारणाचे महत्त्व ओळखत शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रमदान केले. टाकाऊ गोण्यांत वाळू व माती भरून ओवाडी नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडविले जाणार आहे. पाणी जमिनीत मुरल्याने भूजल पातळीही वाढणार आहे. यामुळे जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. तसेच जमिनीत पाणी मुरल्याने रब्बीच्या पिकांना संरक्षित ओलावा मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणाबाबत जनजागृती होण्यासही मदत होणार आहे.
तालुका कृषी अधिकारी भगवान गोरडे, मंडळ कृषी अधिकारी नीलेश बोंद्रे, उपकृषी अधिकारी अनिल बच्छाव, सहाय्यक कृषी अधिकारी मनीषा पवार यांच्यासह सावता शेतकरी सेंद्रिय गटाचे अध्यक्ष रवींद्र खैरनार, वाल्मीक चव्हाण, दत्तात्रय खैरनार, राजेंद्र जाधव, मनोज खैरनार, योगेश शेवाळे, महेश खैरनार, भाऊसाहेब शेवाळे, जगन्नाथ खैरनार, किशोर वाघ, आप्पा वडगे, ज्ञानेश्वर खैरनार, लखन देवरे यांच्यासह पाणी फाउंडेशनचे सदस्य व शेतकरी सहभागी झाले होते.
.............
कोट
वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा होण्यास मदत होते. याचा फायदा जनावरांना तसेच रब्बी पिकांना होऊ शकतो. सावता शेतकरी सेंद्रिय गटाने लोकसहभागातून राबविलेला हा उपक्रम जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
- मनीषा पवार, सहाय्यक कृषी अधिकारी, मालेगाव
................