SGR26B07577
सोनगीर : पापड तयार करताना वंदना चौधरी.
----------
पापड विक्री ते उद्योजक
सोनगीरच्या वंदना चौधरी यांचा प्रवास
एल. बी. चौधरी : सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. १४ : घरची अत्यंत गरीब परिस्थिती, पोटाची खळगी भरण्यासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे या विचारातून नागली पापड बनवून घरोघर विक्री करीत विकास साधणाऱ्या येथील वंदना लक्ष्मण चौधरी यांचा जीवन प्रवास युवा पिढी व महिलांना आदर्श असा आहे.
मुळ वाघाडी (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी लक्ष्मण चौधरी व त्यांची पत्नी वंदना चौधरी उदरनिर्वाहासाठी चाळीसगावला पोहचले. पण, जम न बसल्याने २००४ मध्ये गावी परत आले. अवघ्या दीड हजार लोकवस्तीच्या खेडेगावात सौ. चौधरी यांनी हार न मानता नागली पापड करून घरोघरी विक्री सुरू केले. पुढे उडीद व अन्य पापड बनवायला सुरुवात झाली. चौधरी कुटुंब वाघाडी सोडून २०१७ मध्ये सोनगीरला आले. सौ. चौधरी यांनी भावांकडून उसने पैसे घेत पिठाची गिरणी सुरू केली. वीजमीटर घेण्यासाठी मंगळसूत्रही विकले. पती लक्ष्मण चौधरी गिरणी चालवू लागले व स्वतः वंदना चौधरी पापड बनवत. व्यवसाय वाढल्याने पाच ते सहा महिलांना त्यांनी रोजंदारीवर कामाला नेमले. त्यांच्याकडे नागली, उडीदसह विविध १६ प्रकारचे पापड तयार करून मिळतात. त्यात टोमॅटो, मिरची व लसणाच्या पापडांचा समावेश आहे. पिठाच्या गिरणीनंतर पापड यंत्र, विविध डाळी, लाल मिरचीपासून तिखट पावडर बनवणे आदी २५ ते २६ यंत्रे आणली आणि व्यवसायात मोठी झेप घेतली. तिची सुशिक्षित मुले तुषार आणि सौरभ आईच्या कामात हातभार लावतात. चौधरी यांनी बचतगटांच्या माध्यमातून काही महिलांना रोजगार दिला आहे. दरम्यान, संघर्षातून प्रगती साधलेल्या महिलांना त्यांच्या पुढील प्रगतीसाठी मदत म्हणून एसबीआय फाउंडेशनने मुंबईला मुलाखतीस बोलावून आठ लाख दिले. वंदना चौधरींचा शुन्यातून जग निर्माण करण्याच्या जिद्दीचा अनेकांनी सन्मान केला आहे.