वणीची श्री जगदंबा देवी

वणीची श्री जगदंबा देवी
Published on: 
फोटो - सीमोल्लंघनातून सामाजिक ऐक्याचा जागर --------------------------------- वणीची श्री जगदंबा देवी देशमुख-थोरात कुटुंबीयांच्या पुढाकारातून शेकडो वर्षांपासून जपली जाणारी वणीच्या श्री जगदंबा देवीची दसरा मिरवणूक सामाजिक सलोख्याचे अनोखे प्रतीक ठरली आहे. संबळ-तुतारीचा निनाद, पालखी मिरवणुकीतील सर्वधर्मीयांचा सहभाग आणि आपट्याच्या पानांची देवाणघेवाण अशा परंपरांतून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा राजेशाही सोहळा वणीच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख बनला आहे. - दिगंबर पाटोळे श्रीक्षेत्र वणी येथील श्री सप्तशृंगी मातेचे मूळरूप मानल्या जाणाऱ्या श्री जगदंबा देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होतो. नऊ दिवस मंदिर परिसरात एक हजाराहून अधिक महिला भाविक घटस्थापना करून उपवास करतात. महानवमीच्या दिवशी श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीने शतचंडी यागाचे आयोजन केले जाते. यजमानांच्या हस्ते होम यज्ञात आहुती दिल्यानंतर मध्यरात्रीनंतर कोहळ्याचा प्रतीकात्मक बळी देऊन यागाची पूर्णाहुती होते. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत जगदंबा मातेची महाआरती होते. विजयादशमीच्या दिवशी देवीची पंचामृत महापूजा आणि दुपारी नैवेद्य आरती झाल्यानंतर मंदिर परिसरात भाविकांची विशेष गर्दी होते. नऊ दिवस घटस्थापना करून उपवास करणाऱ्या महिला व पुरुष भाविकांकडून नववस्त्र परिधान करून देवीचे दर्शन घेतले जाते. पुरणपोळी, खीर, वरण-भात आदी पदार्थांचा नैवेद्य अर्पण करून जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली जाते. सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत वणीसह परिसरातील गावांमधून आलेल्या हजारो महिला भाविकांची नैवेद्य अर्पण करण्यासाठी गर्दी होते. उपवास सोडून भावपूर्ण वातावरणात भाविक देवीचा निरोप घेतात. पालखी मिरवणुकीत सर्वधर्मीयांचा सहभाग दसऱ्याच्या दिवशी देशमुख वाड्यातून संबळ आणि तुतारीच्या निनादात देवीची पालखी मिरवणूक निघते. शिवनेरी चौकात जैन व विश्वकर्मा बांधव, संताजी चौकात तेली समाज, तर शिंपी गल्लीत क्षत्रिय शिंपी समाज सहभागी होतो. येथे खंडोबा महाराजांची पालखीही परंपरेनुसार मिरवणुकीत सामील होते. मस्जिद चौकात काजी बाबा आणि मुस्लिम बांधवांना सन्मानपूर्वक निमंत्रित करून मिरवणुकीत सहभागी करून घेतले जाते. पुढे खांडे गल्ली, देवी मंदिर चौक, कुंभार गल्ली, पांचाळ गल्ली, कोळीवाडा आणि राजवाडा मार्गे पालखीची मिरवणूक मार्गस्थ होते. प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांकडून पालखीचे स्वागत केले जाते. ‘सोन्या’ची देवाणघेवाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सीमोल्लंघन सोहळ्याची सांगता होते. येथे आपट्याच्या झाडाची वैदिक पद्धतीने पूजा करून लुट केली जाते. त्यानंतर देशमुख-थोरात कुटुंबीयांच्या मानकऱ्यांच्या हस्ते चंद्रभान या पारंपरिक हत्याराने कोहळ्यावर वार करून प्रतीकात्मक बळीविधी केला जातो. पुढे देवीची पालखी मंदिरात नेऊन आरती करण्यात येते. यानंतर ग्रामस्थ एकमेकांना आलिंगन देत आपट्याची पाने देऊन दसरा साजरा करतात. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा संगम असलेला वणीचा हा सीमोल्लंघन सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा जिवंत आदर्श ठरतो.
Marathi News Esakal
www.esakal.com