इमारत उभी, उद्घाटन रखडले; वरखेड्याचे आरोग्य प्रशासनाला दिसणार कधी?

इमारत उभी, उद्घाटन रखडले; वरखेड्याचे आरोग्य प्रशासनाला दिसणार कधी?
Published on: 
13298 वरखेडा ः आदिवासी उपयोजनेंतर्गत उभारण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत. वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र धूळखात रुग्णांना जुन्या, धोकादायक इमारतीतूनच सेवा; ग्रामस्थांचा अपेक्षाभंग सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २७ : वरखेडा (ता. दिंडोरी) येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही ती अद्याप रुग्णसेवेत दाखल झालेली नाही. त्यामुळे रुग्णांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना जुन्या, धोकादायक इमारतीतूनच सेवा घ्यावी व द्यावी लागत आहे. नवीन इमारत तयार होऊनही आरोग्यसेवा सुरू करण्यास विलंब लागत आहे. आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने जिल्हा परिषदेने नवीन इमारत उभारली. या इमारतीमुळे सुसज्ज आरोग्य सुविधा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बांधकाम पूर्ण होऊनही इमारतीचा प्रत्यक्ष वापर सुरू न झाल्याने शासनाच्या निधीतून उभारलेल्या सुविधेचा लाभ नागरिकांना मिळालेला नाही. जुन्या इमारतीची स्थिती धोकादायक असल्याचे सांगितले जात असताना तेथूनच रुग्णसेवा सुरू आहे. त्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. वरखेडा व परिसरातील ग्रामीण आणि आदिवासी वस्त्यांसाठी हे आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहे. किरकोळ आजारांवरील उपचार, तपासण्या आणि औषधोपचारांसाठी नागरिक येथे येतात. नवीन इमारतीत सेवा सुरू झाल्यास रुग्णांना अधिक सुरक्षित वातावरणात उपचार मिळण्यास मदत होईल. नवीन इमारतीत आरोग्यसेवा सुरू करण्यासाठी कोणत्या प्रशासकीय प्रक्रिया प्रलंबित आहेत, उपकरणे व औषधसाठ्याची उपलब्धता आहे का, याबाबत आरोग्य विभागाने स्पष्टता द्यावी. तसेच इमारत रुग्णसेवेत दाखल करण्याची तारीख जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेपेक्षा नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणे महत्त्वाचे असल्याने प्रशासनाने विलंब दूर करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com