Kartik Purnima 2022 : कार्तिक पौर्णिमा महोत्सवास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

On the occasion of Kartik Poornima festival, the crowd gathered in the temple for darshan.

Kartik Purnima 2022 : कार्तिक पौर्णिमा महोत्सवास प्रारंभ

पंचवटी (जि. नाशिक) : शनी चौक परिसरातील पुरातन कार्तिक स्वामी मंदिरात त्रिपुरारी अर्थात कार्तिक पौर्णिमा महोत्सवास सोमवारी (ता. ७) प्रारंभ झाला. दुपारी रामकुंड येथे उत्सव मूर्तींना स्नान व अभिषेक करण्यात आला. त्यांनतर या मूर्तींची कार्तिक स्वामी मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन कलशधारी महिलांनी गोदावरी नदीचे पवित्र जल आणले गेले. बुधवार (ता. ९) पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.

शबरीची बोळ येथील प्रवेशद्वारातून भाविकांना प्रवेश दिला जाणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पंचवटी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Various events at archaic Kartik Swamy temple on occasion of kartik purnima festival 2022 nashik news)

श्री काशी नाट्टुकोटाई नगर छत्रम् मॅनेजिंग सोसायटीतर्फे शनी चौक परिसरातील पुरातन कार्तिक स्वामी मंदिरात महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारी (ता. ७) सायंकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी कार्तिक पौर्णिमा सुरू झाली. यानिमित्त मंदिरात अभिषेक, महापूजा आरती करण्यात आली.

त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंगळवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजून ३२ मिनिटांपर्यंत पौर्णिमा सुरू राहणार आहे. मध्यरात्री १ वाजून ३९ मिनिटांनी कृत्तिका नक्षत्र सुरु होऊन ते बुधवारी (ता. ९) मध्यरात्री ३ वाजून ९ मिनिटांपर्यंत असल्याने या मुहूर्तावर देखील मंदिर भाविकांना खुले राहणार आहे.

हेही वाचा: MSRTC Income During Diwali : दिवाळीच्या कमाईत लालपरी सुसाट!

श्री काशी नाट्टुकोटाई नगर छत्रम् मॅनेजिंग सोसायटीतर्फे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना २५ हजार लाडूचा प्रसाद वाटप केले जाणार आहे. या उत्सवाकरिता तमिळनाडू येथील मंदिराचे सर्व मुख्य ट्रस्टी उपस्थित राहणार आहेत. सुरू असलेल्या या उत्सव काळात भाविकांना मंदिरात अभिषेक करता येणार असल्याचे, मंदिर व्यवस्थापक यांनी सांगितले. भाविकांनी या उत्सवानिमित्त मंदिरात दर्शनासाठी येण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, कार्तिक पौर्णिमेनिमित्त मंदिराच्या बाहेर हार-फुले, प्रसाद यासह मोरपीस विक्री दुकाने थाटलेली आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी पूर्व दिशेने मंदिरात प्रवेश दिला जाणार असून, येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

हेही वाचा: Wedding Season: नियोजनासाठी लग्नघरी लगबग सुरू; 26 नोव्हेंबरपासून लग्नाचा धूमधडाका!