सिंधी बांधवांचा आजपासून वर्सी महोत्सव
(उपशीर्षक)
जळगावात जय्यत तयारी; देशविदेशातून भाविक दाखल; भाविकांमध्ये उत्साह
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : अमर शहीद संत कंवरराम साहेब, संत बाबा हरदासराम साहेब (गोधडीवाले बाबा) आणि संत बाबा गेलाराम साहेब यांच्या स्मरणार्थ वर्सी उत्सव साजरा केला जातो. त्यानुसार यंदाच्या चार दिवसीय महोत्सवाला गुरुवारी (ता.२९) सुरवात होत आहे. त्या अनुषंगाने महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून बाहेरगावाहून दीडशे ते दोनशे भाविक देखील दाखल झाले आहेत.
जळगावातील सिंधी बांधवांचा पवित्र आणि प्रसिद्ध असलेला ''वर्सी महोत्सव'' दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अमर शहीद संत कंवरराम नगर येथील पूज्य सेवा मंडळात या चार दिवसीय धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अमर शहीद संत कंवरराम साहेब यांचा ६९ वा, संत बाबा हरदासराम साहेब (गोधडीवाले बाबा) यांचा ४९ आणि संत बाबा गेलाराम साहेब यांचा १८ वा महोत्सव यंदा साजरा होत आहे. त्या अनुषंगाने सेवा मंडळाच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
पंचामृत स्नानाने सुरुवात
चार दिवसीय महोत्सवाची सुरुवात गुरूवारी (ता.२८) पहाटे समाधी साहेबांच्या पंचामृत स्नानाने होईल. यानंतर विश्वशांतीसाठी भव्य महायज्ञ, अखंड पाठ साहेब, पल्लव साहेब आणि ५६ भोग यांसारखे विविध धार्मिक विधींना सुरवात होईल. चार दिवस वेगवेगळे कार्यक्रम होऊन १ नोव्हेंबरला महोत्सवाचा समारोप होईल.
भाविकांची येण्यास सुरवात
या उत्सवासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून आणि परदेशातूनही हजारो सिंधी भाविक जळगावात दाखल होत असतात. जळगाव रेल्वे स्थानकावर बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी विशेष मंडप उभारला जातो आणि त्यांना सेवा मंडळापर्यंत आणण्यासाठी चोवीस तास मोफत वाहन सेवा दिली जाते. दरम्यान महोत्सवाला अद्याप दोन दिवस बाकी असले तरी येथे सेवा देण्यासाठी कोलकाता, बनारस, बऱ्हाणपूर, अमरावती, नागपूर येथील भाविक दाखल झाले आहेत.
इन्फो
मंडप उभारणीसह आकर्षक रोषणाई
आलेल्या भाविकांच्या स्वागतासाठी व राहण्याची व्यवस्था पूज्य सेवा मंडळात केली जात आहे. महोत्सवासाठी सेवा मंडळ परिसरात भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. तसेच आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे.