निष्ठावान संघसाधकास समाज मुकला
वासुदेव, वृंदा शिंगणे यांच्या शोकसभेतील सूर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : काही माणसांची निष्ठा हयातभर आपल्या विचारांशी असते. त्यांचे तन, मन आणि धनदेखील समाजहिताच्याच हिताचा अखंड विचार करीत होते. अशी निष्ठावान माणसे खऱ्या अर्थाने समाज समृद्ध करतात, असा सूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, पूर्व प्रचारक आणि आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्र व समाजसेवेसाठी समर्पित करणारे वासुदेव रामचंद्र शिंगणे तथा आबा आणि त्यांच्या पत्नी वृंदा वासुदेव शिंगणे या सेवाव्रती दाम्पत्याच्या शोकसभेटून उमटला.
संघ परिवारातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था आणि शिंगणे कुटुंबीयांतर्फे मोहिनीदेवी रुंगटा विद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहीच्या आबांच्या जाण्याने राष्ट्रकार्यासाठी झटणारा एक निष्ठावान संघसाधक आणि चालता-बोलता इतिहास हरपल्याची तीव्र भावना सभेतून व्यक्त झाली. शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या आदर्श दाम्पत्याच्या स्मृतींना उजाळा दिला आणि आदरांजली अर्पण केली. या वेळी व्यासपीठावर आणि उपस्थित मान्यवरांमध्ये गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, शहर संघचालक डॉ. मालपाठक, भारतीय इतिहास संकलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश टेमघिरे, येवला येथील कार्यकर्ते रमाकांत भावसार, शास्त्रज्ञ आणि इतिहास संकलन समितीचे कार्यकर्ते ओमप्रकाश कुलकर्णी, विलास देवळे, वनवासी कल्याण आश्रमाचे नागेश काळे, भगूर शिक्षण मंडळाचे एकनाथ शेटे, पुरोहित संघांचे सतीश शुक्ल, जयराम शिंदे, केदार शिंगणे यासह अनेक मान्यवर, विविध संस्थांचे प्रतिनिधी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.