------------
३०-२
भूजल पातळी खालावल्याने
वावी परिसरात पाणीटंचाई
-------------
अनेक शेतकऱ्यांनी टाळली रब्बीपेरणी
------------
सकाळ वृत्तसेवा
वावी, ता.१६ ः वावीसह परिसरात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. विहिरींची भूजल पातळी खालावण्यास सुरुवात झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई आतापासून बसू लागली आहे.
-----------
पर्जन्यमान अल्प राहिल्याने त्याचा फटका खरिपाला बसला आहे. खरीप तर वाया गेलाच परंतु, रब्बीची आशा पूर्णतः मावळली आहे. खरिपात केलेला भांडवली खर्चही शेतकऱ्यांना मिळाला नाही. दरम्यान सरकारने दिवाळीसाठी जाहीर केलेली अग्रीम रक्कम अजूनही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. फार्मर आयडी, केवायसी यात ही मदत अडकून बसली आहे. ही मदतही तुटपुंजी असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मार्च महिन्यात परिणाम होणारी भूजल पातळी यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच तळाला पोहोचली आहे. विहिरी, कूपनलिका यांनी तळ गाठण्यास सुरवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी कांदा, गहू, हरभरा अशा पिकांची पेरणी केली असली तरी ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची सुरु असलेली धावपळ आणि विहिरीने गाठलेला तळ विचारात घेता हा खर्चही वाया जाण्यासारखी स्थिती आहे. भूजलाचा वेगाने उपसा सुरू झाल्यामुळे पाण्याची पातळीही वेगाने खालावत चालली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केलेली नाही.
----------------