विश्रामगडावर गडवाट परिवाराकडून परंपरेचे जतन
भक्तिमय वातावरणात तोरण बांधून विजयादशमी साजरी.
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२० : इतिहास पानांतून बाहेर पडून जेव्हा जिवंत होतो, तेव्हा तो केवळ सोहळा राहत नाही, तर तो एक सोहळा नव्हे तर अस्मितेचा जागर ठरतो. विजयादशमीच्या अशाच एका मंगल मुहूर्तावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पवित्र झालेल्या ऐतिहासिक विश्रामगड किल्ल्यावर शिवप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत होता. निमित्त होते गडवाट परिवाराच्या वतीने आयोजित विशेष दसरा महोत्सवाचे.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात गडावर जय भवानी आणि हर हर महादेवाचा जयघोष निनादला. गडवाट संस्थेकडून गेल्या चौदा वर्षांपासून राज्यभरातील विविध गडकिल्ल्यांवर विजयादशमीच्या दिवशी तोरण बांधण्याची एक अनोखी परंपरा जपली जात आहे. यंदा या परंपरेचा मान विश्रामगडाला मिळाला. गडाचे ऐतिहासिक पावित्र्य जपत आणि शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी गडावर दसऱ्याचे तोरण बांधले.
या सोहळ्याचे वातावरण केवळ ऐतिहासिक राहिले नाही, तर त्यात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक गोडवाही मिसळला होता. युवा भजनी मंडळ, धामणगावच्या कलाकारांनी सादर केलेल्या टाळ-मृदंगाच्या गजरातील भजनाने संपूर्ण गडपरिसर दुमदुमून गेला. ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगांची गोडी आणि छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष यामुळे उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. इतिहासाची महती सांगणारा हा सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी गडवाटकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण उपक्रमात भूषण पागेरे, गौरव थोरात, उमेश शिंदे, कैलास जाधवराव आणि समाधान खुळे यांच्यासह अनेक उत्साही गडवाटकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उपस्थित सर्व गडप्रेमींचे यावेळी आभार मानण्यात आले.
आपली समृद्ध गडसंस्कृती, संतांची भक्तीपरंपरा आणि शिवरायांचा गौरवशाली इतिहास असाच जपूया आणि तो भावी पिढीपर्यंत पोहोचवूया, हा दृढ संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. तोरण बांधणीच्या या विधीसोबतच विश्रामगडाच्या मातीतील शौर्याचा सुगंध पुन्हा एकदा संपूर्ण परिसरभर दरवळला.