मेन
फोटो : H32893, H32873, H32939, H32940 (छायाचित्रे : केशव मते, विकी कदम)
विजयादशमीने मांगल्याच्या पर्वास प्रारंभ
बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण; धार्मिक उत्साहाबरोबरच बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : विजयादशमी म्हणजे विजय, मांगल्य आणि नव्या सुरुवातीचा उत्सव! मंगळवारी (ता. २०) साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीच्या निमित्ताने धार्मिक उत्साहाबरोबरच बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग अनुभवायला मिळणार आहे. नवरात्रोत्सवाची सांगता, सीमोल्लंघनाची परंपरा आणि दिवाळीच्या आगमनाची चाहूल यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. सोने- चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने, गृहपयोगी उपकरणे यांच्या खरेदीसाठी ग्राहकांकडून पसंती दिली जाते. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातूनही ग्राहक विविध सवलतींचा लाभ घेण्याच्या तयारीत आहेत.
विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणे, घर किंवा वाहन खरेदी करणे, नवीन वस्तूंची खरेदी करणे यासाठी अनेक जण या दिवसाला प्राधान्य देतात. सोने खरेदीला विशेष महत्त्व असून, आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोन्याचे प्रतीकात्मक आदानप्रदान करण्याची परंपराही आज जपली जाते. विजयादशमीच्या दिवशी घरोघरी देवीची पूजा, घटस्थापनेचे विसर्जन, शस्त्रपूजन, वाहनपूजन आणि कामाच्या साधनांचे पूजन केले जाते. काही ठिकाणी शमी वृक्षाची पूजा करून सीमोल्लंघन केले जाते. प्रभू श्रीरामांनी रावणावर मिळविलेला विजय आणि देवी दुर्गेने महिषासुराचा केलेला वध या विजयाच्या प्रतीकात्मक कथा या सणाचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करतात.
---
इलेक्ट्रॉनिक्स, वाहन खरेदीला पसंती
दूरचित्रवाणी, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला जातो. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठीही हा दिवस शुभ मानला जातो. ऑनलाइन खरेदी संकेतस्थळांवरील सवलती, बँक ऑफर्स आणि विविध आकर्षक योजनांमुळे ग्राहकांना खरेदीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. प्रत्यक्ष दुकानांतील खरेदी आणि ऑनलाइन व्यवहार अशा दोन्ही माध्यमांतून सणासुदीच्या खरेदीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
---
तयारीला वेग
विजयादशमी पार पडताच दिवाळीचे काऊंटडाऊन सुरू होते. घरांची साफसफाई, रंगरंगोटी, सजावटीच्या वस्तू, कपडे, मिठाई आणि भेटवस्तूंच्या खरेदीचे नियोजन सुरू होते. त्यामुळे दसरा हा धार्मिक श्रद्धेचा उत्सव असण्याबरोबरच सणासुदीच्या अर्थचक्राला गती देणारा दिवसही ठरतो.
---
मुहूर्ताचे महत्त्व
ज्योतिषाचार्यांच्या मते, विजयादशमीला विजय मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, यंदा विजय मुहूर्त साधारण दुपारी २.१५ ते ३.०२ या वेळेत आहे. शस्त्रपूजा तसेच वस्तूंची पूजा या वेळेत करण्याचा प्रघात आहे.
---कोट
विजयादशमी हा विजय आणि शुभारंभाचा दिवस मानला जातो. या दिवशी शमीपूजन, शस्त्रपूजन आणि सीमोल्लंघनाला धार्मिक महत्त्व आहे. विजय मुहूर्तावर नवीन कार्याचा संकल्प करणे शुभ मानले जाते. मात्र, मुहूर्ताबरोबरच श्रद्धा, सद्भावना आणि प्रामाणिक प्रयत्न यांनाही तितकेच महत्त्व आहे.
-अमोल किरपेकर, गुरुजी