पान तीन
------------
विजयादशमीनिमित्त रामतीर्थ परिसरातील वाहतुकीत बदल
''मालेगाव स्टँड ते गाडगे महाराज पूल'' मार्ग दुपारपासून वाहतुकीसाठी बंद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १९ : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २०) रामतीर्थ, गंगाघाट परिसरात होणारा रावण दहन सोहळा, रामलीला कार्यक्रम आणि दुर्गादेवी मूर्ती विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल केले आहेत. त्यानुसार मंगळवारी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत मालेगाव स्टँड ते गाडगे महाराज पूल या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी केले.
रामतीर्थ, गंगाघाट पार्किंग मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यापूर्वी चतुःसंप्रदाय आखाडा येथून श्रीराम व लक्ष्मण सेनेची मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, सीतागुंफा रोड, श्री काळाराम मंदिर, सरदार चौक आणि साईबाबा मंदिर मार्गे रामतीर्थ गंगाघाट येथे पोहोचेल. यानंतर रामलीला व रावण दहनाचा सोहळा पार पडणार असून. नाशिक शहर आणि ओझर परिसरातील नवरात्र मंडळांच्या देवी विसर्जनासाठीही भाविक रामतीर्थवर येतात. त्यामुळे परिसरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.
-------------
प्रवेश बंद मार्ग : मालेगाव स्टँडकडून रामतीर्थ, सरदार चौक ते गाडगे महाराज पूल; तसेच गाडगे महाराज पुलाकडून सरदार चौक, रामकुंड ते मालेगाव स्टँडकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : सदर मार्गावरून जाणारी वाहने मालेगाव स्टँड – पंचवटी कारंजा – निमाणी बस स्टँड – काट्या मारुती चौक – गणेशवाडी मार्गे पुढे जातील व येतील.
नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. अधिसूचनेचे उल्लंघन करून नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम व मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
- चंद्रकांत गवळी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा, नाशिक.