धुळे ः टुडे १ साठी, संक्षिप्त...............मास्क हेडला नेव्हीगेशन करणे.......
--
फटाके फोडण्यावरून
शेतकऱ्याला मारहाण
धुळे ः मक्याच्या ढिगाऱ्याला आग लागण्याची शक्यता असल्याने अंगणात फटाके फोडू नका, असे सांगितल्याच्या रागारागातून शेतकरी व त्यांच्या मुलाला लोखंडी कड्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमनाथ बाळू अहिरे (वय ६५, रा. पोबारे, पोस्ट कुडाशी, ता. साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १० नोव्हेंबरला रात्री नऊला हा प्रकार घडला. संशयित समीर मकम बर्डे याने मज्जाव केल्याच्या कारणावरून सोमनाथ अहिरे आणि त्यांच्या मुलास लोखंडी कड्याने मारहाण करून जखमी केले. हवालदार हजारे तपास करीत आहेत.
---
पाण्याच्या वादातून
पुतण्यावरच हल्ला
धुळे ः शिंदखेड्याजवळच्या साहूर येथे अंगणात पाणी वाहून जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून काका आणि काकूने पुतण्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषाबाई राजेंद्र कोळी (वय ४०, रा. साहुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ११ नोव्हेंबरला दुपारी साडेचारला गल्लीत नळाचे पाणी वाहत असल्यावरून मनीषाबाई आणि त्यांची देराणी छायाबाई यांच्यात वाद सुरू होता. तो सोडवण्यासाठी मनीषाबाईंचा मुलगा प्रभाकर व तुषार हे दोघे आले असता संशयित छायाबाई आणि त्यांचे पती भाऊसाहेब कोळी यांनी तुषारवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. हवालदार महाजन तपास करीत आहेत.
---
तरुणीचा विनयभंग;
कुटुंबीयांना मारहाण
धुळे : घराच्या अंगणात उभ्या असलेल्या १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबीयांना मारहाण, शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित सहा जणांविरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार ७ नोव्हेंबरला सायंकाळी पाचला ती घरासमोर उभी असताना संशयित मोहित मनोहर वाघ (रा. उभंड, ता. धुळे) याने तिच्याकडे पाहत हाताने खाणाखुणा केल्या. नंतर याचा निषेध केला असता मोहितची आई शीतल वाघ (रा. उभंड), जयराज ठाकरे, भानुदास ठाकरे, चेतन ठाकरे आणि प्रतीक ठाकरे (सर्व रा. खाकुर्डी, ता. मालेगाव) यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करत जिवंत गाडण्याची धमकी दिली. हवालदार बोरसे तपास करत आहेत.
---
दुचाकी घसरून
एकाचा मृत्यू
धुळे : साक्री तालुक्यातील रायपुरच्या पुढील रावळ्या-जावळ्या डोंगराजवळ दुचाकी ((जीजे ०५, एमके ३०६३) घसरली. या अपघातात दुचाकीस्वार विजय राघो बागुल (रा. दुसाने, ता. साक्री) हा गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला, तर मागे बसलेला मित्र भटू बागुल जखमी झाला. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वार विजय बागूल याच्याविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक कलीम शेख तपास करीत आहेत.
---
दुचाकी धडकेत
प्रौढाचा मृत्यू
धुळे ः शहरातील साक्री रोडवरील सुरेंद्र डेअरीजवळ १० नोव्हेंबरला रात्री साडेआठला उडाणे (ता. धुळे) येथील जिभाऊ नंदा मोरे (वय ५५) हे उभे असताना त्यांना दुचाकीने (एमएच १८, सीए ६५३४) धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने जिभाऊ मोरे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी योगेश पंडित मोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.