जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने ''डेथ ऑडिट''चे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने ''डेथ ऑडिट''चे आदेश
Published on: 
विष्णू काकविपुरे मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल; ७ दिवसांत सविस्तर अहवाल सादरचे निर्देश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : जिल्हा रुग्णालयात उपचाराअभावी विष्णू आनंद काकविपुरे यांच्या मृत्यू प्रकरणाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. याप्रकरणी तातडीने तज्ज्ञ वैद्यकीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्याचे आणि पुढील ७ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत. शनिवारी (ता. १७) सायंकाळी विष्णू काकविपुरे यांचा जिल्हा रुग्णालयात उपचाराअभावी मृत्यू झाला होता. यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी दीपक डोके व मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून उपचारातील त्रुटींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आपत्कालीन विभागातील वैद्यकीय सेवा, डॉक्टरांची उपस्थिती, सोनोग्राफी तपासणी तसेच रुग्णाला खासगी केंद्रात पाठवण्यामागील कारणांबाबत निवेदनात शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. सदर प्रकरणाचे तज्ज्ञ समितीमार्फत डेथ ऑडिट करून सर्व बाबींचा समावेश असलेला सविस्तर अहवाल पुढील ७ दिवसांच्या आत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. या आदेशाची प्रत आरोग्य सेवा उपसंचालक आणि पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनाही पाठवण्यात आली आहे. --- या मुद्द्यांची होणार पडताळणी -रुग्णाची पूर्वव्याधी व प्रकृती : रुग्णाची यकृताची समस्या किंवा इतर पूर्वव्याधी, तसेच संदर्भ रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात हलवतानाची गंभीर प्रकृती व वैद्यकीय पार्श्वभूमी. - उपचार व केसपेपर्स : रुग्णाला दाखल केल्यापासून दिलेले उपचार आणि केसपेपर्समधील नोंदींची सखोल तपासणी. - आपत्कालीन सेवा : रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात रुग्ण आल्यावर उपलब्ध असलेली सेवा, डॉक्टरांची उपस्थिती व मिळालेले तत्काळ उपचार. - खासगी केंद्रात पाठवण्याचे कारण : रुग्णाला खासगी केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यामागील तांत्रिक किंवा वैद्यकीय कारणे आणि वस्तुस्थिती.
Marathi News Esakal
www.esakal.com