एक शून्य शून्य
.....
नरेंद्र पिंगळे, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी
फोटो H31234
.....
एक कोटीच्या खंडणीसाठी विपिनचा खून
.....
ओझर येथील धान्य व्यापाऱ्याच्या एकुलत्या मुलाचे एक कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अपहरणकर्त्यांनी अपहृत मुलाचा खून केला. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी गुन्ह्याचा तपास करीत दोघा सराईत गुन्हेगारांना अटक केली होती.
- नरेश हाळणोर
ओझर येथील धान्य व्यापारी गुलाबचंद बाफना यांचा एकुलता मुलगा विपिन बाफना हा नाशिकमध्ये इंजिनिअरिंग करीत होता. त्याशिवाय पंचवटी कारंजा परिसरात डान्स क्लासलाही जात होता. ९ जून २०१३ रोजी त्याच्या काकांनी त्याला पंचवटी कारंजा येथे डान्स क्लासला जाण्यासाठी कारमधून सोडले होते. त्यानंतर तो आडगाव शिवारातील इंजिनिअरिंग कॉलेजला जाणार होता. परंतु सायंकाळपर्यंत तो घरी पोहोचला नाही, म्हणून वडील गुलाबचंद बाफना यांनी त्याला कॉल केला असता, त्याने मित्राकडेच थांबणार असल्याचे सांगितले. १० जूनला दुसऱ्या दिवशीही तो सायंकाळपर्यंत घरी आला नाही. पण सायंकाळी त्याच्या मोबाईलवरून एक कॉल आला, त्यांनी गुलाबचंद यांच्याकडे एक कोटींच्या खंडणीची मागणी केली. मुलाचे अपहरण केल्याचेही सांगितले. परंतु गुलाबचंद यांनी उलट संबंधिताची मस्करी केल्याबद्दल शिवीगाळ केली. पण, विपिन घरी न आल्याने त्यांनी थेट पंचवटी पोलिस ठाणे गाठले आणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. संशयितांनी ११ जूनला पुन्हा दुसऱ्याच मोबाईलवरून संपर्क साधून गुलाबचंद यांच्याकडे खंडणीची मागणी केली. तेव्हा मात्र गुलाबचंद यांनी पंचवटी पोलिसात धाव घेत खंडणीच्या फोनबाबतची माहिती दिली. त्यानुसार, अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला.
आडगाव शिवारात मृतदेह
१३ जून २०१३ च्या पहाटे आडगाव शिवारात असलेल्या म्हशीच्या गोठ्यातील परप्रांतीय कामगार शौचाला शेतात उघड्यावर जात असताना त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आला. गोठा मालकाला खबर दिल्यानंतर आडगाव पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाच्या शरीरावर धारदार हत्याराने वार करण्यात आलेले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंचवटी पोलीसही घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचे वर्णन अन् बेपत्ता विपिनचे वर्णन मिळते-जुळते असल्याने शहानिशा केली असता, तो विपिनचा होता याची खात्री पटली. याप्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात अपहरण, खंडणीचा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक आयुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी तपास सुरू केला.
मोबाइलने दिली दिशा
संशयितांनी खंडणीसाठीचा पहिला कॉल विपिनच्या मोबाईलवरून केला. त्यानंतर दुसरा कॉल दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून केला. दोन्ही कॉलचे तांत्रिक विश्लेषण अहवालानंतर वाशीममधून एकाला ताब्यात घेतले असता, ज्या क्रमांकावरून कॉल केला गेला तो त्याचा मोबाईल क्रमांक होता, परंतु तो एप्रिल महिन्यात नाशिकला आला, त्या वेळी तो चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही कॉलचे लोकेशन पंचवटी परिसरातील होते. त्यानुसार, शोध सुरू केला असता महाविद्यालयीन मुलांना मारझोड करून लूटमारी करणारा सराईत गुन्हेगार अमन जठ (रा. केवडीबन, पंचवटी) याचे नाव समोर आले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने काही माहिती नसल्याचेच सांगितले. त्याचवेळी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. त्याने विपिनसह दोघांना रिक्षातून धात्रक फाटा परिसरात सोडले होते. त्याच्या चौकशीतून रिक्षातून भाड्याने गाद्या नेऊन जठच्या फ्लॅटवर पोहोच केल्याचे समोर आले. जठचा फोटो दाखविल्यानंतर त्याने त्याला ओळखले. पोलिसांनी पुन्हा जठकडे पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या मोबाइलमधून महत्त्वाचे व्हिडिओ आणि कॉल्सही पोलिसांच्या हाती लागले. सराईत गुन्हेगार चेतन पगारे (रा. ओझर) हा अपहरण, खंडणी अन् खूनाचा सूत्रधार असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले.
महिन्याभरापासून कट
चेतन पगारे ओझरचाच असल्याने तो विपिनला ओळखत होता. त्याने अमनशी संगनमत करून त्याच्या अपहरणाचा कट रचला. त्यासाठी अमनने भाड्याने फ्लॅट घेतला. अमनने त्याच्या बहिणीला विपिनला फोन करावयास लावले. त्याच्या कॉलेजमधीलच असल्याचे सांगत तिने विपीनला पंचवटी कॉलेजजवळ बोलावले असता तो गेला. ती आली नाही पण चेतन व अमन त्याला भेटले. त्यानंतर ते त्याला घेऊन गेले. मद्यपान करून त्याला फ्लॅटवर नेले. ठरल्यानंतर त्यांनी विपिनचे हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावून किचनमध्ये डांबले. त्याच्याच मोबाईलवरून खंडणीची मागणी केली. त्याचवेळी चेतनने त्याच्या एका मित्राला ओझरवरून त्याची दुचाकी आणायला लावली. तो ती घेऊन फ्लॅटवर आला. त्या वेळी ते तिघे बोलत असताना विपिन आशेने किचनमधून रांगत हॉलमध्ये आला. चेतनच्या मित्राने त्याला ओळखले पण त्यालाही चेतनने जीवे मारण्याची धमकी दिल्याने तो निघून गेला.
अन् खून केला
दुसऱ्या दिवशी ११ जूनला चेतनने पुन्हा कॉल करून खंडणीची मागणी केली. पण पोलिसात गुन्हा दाखल झाल्याचे माहिती झाल्याने त्यांनी १२ जूनला रात्री विपिनला घेऊन आडगाव शिवारात नेले. विपिनला सुटका करायची असल्याचे सांगितल्याने तोही विश्वास ठेवून गेला. रात्रीच्या अंधारात चेतन, अमनने त्याला एका शेतातल्या पडीक खोलीत नेले आणि त्याच्याकडील धारदार हत्याराने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि तो ठार झाल्याचे समजून ते निघून गेले. विपिन गंभीर जखमी अवस्थेत त्या खोलीतून बाहेर आला. काही पावले चालत गेला पण मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाल्याने काही अंतरावर जाऊन तो कोसळला. अतिरक्तस्राव झाल्याने तो त्याचठिकाणी गतप्राण झाला होता. दुसऱ्या दिवशी गोठ्यावाल्यांमुळे सदरील प्रकार निदर्शनास आला.
फाशीची शिक्षा
याप्रकरणात सरकार पक्षाने विशेष जिल्हा सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती केली. चेतन, अजय या दोघांना न्यायालयाने डिसेंबर २०२२ मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली. तर तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी केला तर त्यांना हवालदार शरद साेनवणे, अजय गरुड यांनी मदत केली होती.