CHM26B03613
वाडी- शेवाडी : वाडी-शेवाडी धरणाच्या अपूर्ण कालव्यांसाठी उपोषणाला बसलेले बबलू कोळी.
-------
वाडी- शेवाडी धरणाच्या कालव्यासाठी उपोषण सुरू
दहा मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; निधी खर्चाच्या चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चिमठाणे, ता. १ : बुराई नदीवरील वाडी- शेवाडी (ता. शिंदखेडा) मध्यम प्रकल्प बांधून अनेक वर्षे उलटली तरी डावा व उजवा कालवा अद्याप अपूर्णच आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही कालव्यांची कामे पूर्ण का झाली नाहीत? आलेला निधी नेमका कुठे खर्च झाला, याची चौकशी करावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध दहा मागण्यांसाठी शेवाडे येथील बबलू कोळी व समितीच्या सदस्यांनी रविवारपासून (ता. १) धरणस्थळी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषणस्थळी भेटी दिल्या.
वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्पाची निर्मिती होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. परिणामी धरणात पाणी उपलब्ध असतानाही परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी त्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतीला पाणी मिळणे आवश्यक असताना कालव्यांची अपूर्ण कामे शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरली आहेत. या प्रश्नाकडे शासन व संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी समितीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
वाडी- शेवाडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी कालव्यांद्वारे पाणी वितरणाची पारदर्शक व योग्य पद्धत निश्चित करावी, धरणाच्या मुख्यालयावर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी, धरण व कालव्यांच्या कामांची सद्यस्थिती, उर्वरित कामांचे नियोजन आणि कामे पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, पाणीवाटपात कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, यासाठी संबंधित विभागाने प्रभावी नियोजन करावे, धरण मुख्यालयावर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमित उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उपोषणस्थळी महसूल मंडळ अधिकारी श्रीमती अनिता भामरे, चिमठाणे जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग (भुपादादा) गिरासे, माजी पंचायत समिती सभापती दीपक बोरसे, डॉ. भरतसिंग राजपूत (चिमठाणे) यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी कोमलसिंग अण्णा, भगवान बेहेरे, कोमलसिंग ठाकरे, रमेश वाणी, राजेंद्र गिरासे, ज्ञानेश्वर अहिरे, बाबुलाल कोळी, बापू बागूल, राजाराम अण्णा मोरे, भूषण येवले, गुलाब कोळी, संजय कोळी, अशोक वानखेडे, तुषार माळी, अण्णा मोरे, राजू मोरे, विजय माळी, रमेश मालचे, बापू मगरे, सोनू देशमुख, सतीलाल कोरडकर, सुमित देशमुख, तुषार सोनार, जयपाल महाराज, अलीम खाटीक, योगेश देशमुख आदी उपस्थित होते.