सुरगाणा वाघबारशीने होते दिवाळी सणाची सुरुवात

सुरगाणा  वाघबारशीने होते दिवाळी सणाची सुरुवात
Published on: 
03157 सुरगाणा : गावच्या प्रवेशद्वारे असलेले वाघदेवाची मूर्ती. निसर्ग, वाघदेवाच्या पूजनाने होणार दिवाळीला प्रारंभ आदिवासी बांधव जपताय परंपरा; पिंपळसोंड, पळसनसह सीमावर्ती भागात सणाचा उत्साह सकाळ वृत्तसेवा सुरगाणा, ता. ३ : ‘निसर्ग माझा गुरु, तेथून जीवन माझे सुरू’ या संकल्पनेनुसार, तेजाचे प्रतीक असलेल्या दीपोत्सवास शहरी भागात गाय-वासरू पूजन म्हणजेच ''वसुबारस''ने सुरुवात होत असली, तरी आदिवासी दुर्गम भागात दिवाळीची सुरुवात वेगळ्या आणि पारंपरिक पद्धतीने ''वाघबारशी''ने होते. या दिवशी आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत जंगलात जाऊन गावसेवेवर असलेल्या निसर्ग देवतेची आणि वाघदेवाचे पुजन करतात. या पूजनाने दिवाळीच्या सणाला उत्साहात सुरुवात करतात. गुरुवारी (ता.५) सुरगाणा तालुक्यात आदिवासी बांधवांकडून हे पूजन केले जाईल. हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा व महत्त्वाचा सण मानला जातो. यादरम्यान गोडधोड पदार्थ, नवीन कपड्यांची खरेदी, फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजन व भाऊबीज साजरी केली जाते. मात्र, आदिवासी बांधव हाच सण आपल्या वेगळ्या व पारंपरिक संस्कृतीनुसार साजरा करतात. वाघासारख्या हिंस्त्र श्वापदापासून आपल्या गाई-गुरांचे व पाळीव प्राण्यांचे रक्षण व्हावे, यासाठी आदिवासी ग्रामीण भागात ''वाघबारस'' साजरी करण्याची अनोखी प्रथा आजही अव्याहतपणे सुरू आहे. वाघबारसेच्या दिवशी गुरे चारणारे गुराखी नेहमीप्रमाणे गायी-म्हशी चारण्यासाठी जंगलात घेऊन जातात आणि या दिवशी सर्व गुराखी उपवास करतात. आदिवासी समाजात वाघाला देव मानले जाते, म्हणूनच येथील बहुतांश गावांच्या वेशीवर आणि ग्रामदैवतांच्या मंदिराबाहेर वाघाच्या मूर्ती पाहायला मिळतात. त्यामुळे आदिवासींच्या जीवनात या दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. या निमित्ताने आदिवासी शेतकाम पूर्णपणे बंद ठेवतात. वाघबारसनिमित्त प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व नैवेद्यासाठी वर्गणी गोळा केली जाते. गावाच्या वेशीवरील मंदिरांमध्ये दगडी शिऱ्यावर किंवा लाकडावर वाघदेवता, नागदेवता, मोर, सूर्य आणि चंद्र यांची चित्रे कोरलेली असतात. वाघबारसेच्या दिवशी गावातील प्रमुख मंडळी, भगत, तसेच लहान मुले-मुली नवीन परिधान करून वाघमंदिराजवळ एकत्र येतात. -------- देवदेवतांसह निसर्गपुजन वाघबारशीनिमित्त वाघोबाच्या मंदिराचा संपूर्ण परिसर शिंपडून पवित्र केला जातो. त्यानंतर आदिवासी भगत रूढी-परंपरेनुसार वाघदेव, नागदेव, सूर्यदेव, चंद्रदेव, धरतीमाता तसेच जंगलाची व निसर्गाची पूजा करतात. पूजेच्या वेळी देवतेच्या मूर्तीला शेंदूर लावून दूध व पाण्याने स्नान घातले जाते. पूजेत तांदूळ, नागली, पाचखाद्य, अगरबत्ती व दिवा लावून पूजा केली जाते. पूजाविधी संपल्यानंतर ग्रामस्थ नारळ व गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवतात. दिंडोरी, कळवण, सुरगाणा, सटाणा आणि इगतपुरी तालुक्यातील बहुतेक भागात वाघदेवतेला गोड नैवेद्याबरोबरच परंपरेनुसार मांसाहारी (बोकडाचा) नैवेद्यही दर्शविला जातो. संध्याकाळी गावातील सर्व गुरे आणि पाळीव प्राणी वाघोबाच्या मंदिराजवळ एकत्र आणून त्यांचे पूजन केले जाते. यानंतर गुराखी पारंपरिक गाणी गात गुरांची वाजत-गाजत मिरवणूक काढतात. --------- या भागात सणाचा उत्सवी माहोल ही वाघबारस राज्य सीमावर्ती भागातील पिंपळसोंड, खुंटविहीर, मांधा, रघतविहीर, पळसन, खिर्डी, भाटी, आमदा, जाहूल, पांगारणे, बर्डीपाडा आदी परिसरामध्ये मोठ्या उत्साहात व पारंपारिक चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.