वाघेरा शिवारात अवैध मद्यसाठा जप्त
---
उत्पादन शुल्काची धडक कारवाई : विदेशी मद्याची कारमधून तस्करी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : परराज्यांतून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या अवैध दारूची वाहतूक राज्य उत्पादन शुल्काच्या विभागाने उधळून लावली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा शिवार येथे रचलेल्या सापळ्यात परराज्यांतील विदेशी मद्य व बिअरच्या ३८ बॉक्ससह एक चारचाकी कार जप्त करण्यात आली. या कारवाईत तब्बल सात लाख ३७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, गुजरातच्या एका चालकाला रंगेहाथ पकडण्यात आले.
हरसूल-आंबोली रोडवरील वाघेरा चौफुली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे परराज्यांतील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने शुक्रवारी (ता. २३) परिसरात दारूबंदी कायद्यान्वये वाहनांच्या तपासणीसाठी सापळा रचला.
तपासणीदरम्यान संशयास्पद कार (एमएच १५ सीजी ३०१५) रोखली अन् तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात बंदी असलेले दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेशातील विविध ब्रँडचे विदेशी मद्य व बिअरचा साठा आढळून आला. पथकाने तत्काळ ३८ बॉक्स मद्य आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण सात लाख ३७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी कारचालक संशयित सुमीतकुमार जयसुकभाई पटेल (वय २५, रा. चिकर फलिया, जि. वलसाड, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, नाशिक विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे आणि उपअधीक्षक अ. सु. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड’ विभागाचे निरीक्षक एन. एच. गोसावी, दुय्यम निरीक्षक एस. आर. इंगळे, व्ही. एन. बाविस्कर, जी. बी. नागरगोजे, विष्णू सानप, तसेच जवान एस. ए. माने, उर्वेश देशमुख, लक्ष्मीकांत अहिरे, स्वप्नील सूर्यवंशी, लोकेश गायकवाड आणि वाहनचालक महेश खामकर यांच्या पथकाने केली. निरीक्षक एन. एच. गोसावी तपास करीत आहेत.
फोटो : H33466
नाशिक : वाघेरा शिवारात सापळा रचून जप्त करण्यात आलेला विदेशी मद्याचा साठा. शेजारी उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे व पथक.