‘वाघूर’च्या पाणीवापर फेरनियोजनाला शासनाची मंजुरी
---
कुऱ्हे पानाचे, शेंदुर्णीला फायदा; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १४ : जिल्ह्यातील वाघूर पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणीवापराच्या फेरनियोजनाला राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. या निर्णयासाठी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच मंत्रालय स्तरावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका झाल्या होत्या. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत या विषयावर वारंवार चर्चा झाली होती. या पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागाने बुधवारी (ता. १४) शासन निर्णय जारी करून वाघूर प्रकल्पाच्या पाणीवापराच्या फेरनियोजनास मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे कुऱ्हा पानाचे उपसा सिंचनासाठी ११.३३, तर शेंदुर्णीच्या पाणीपुरवठ्यासाठी २.४७ दशलक्ष घनमीटर पाण्याची तरतूद झाली आहे. वाघूर प्रकल्पाच्या मंजूर सातव्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार एकूण वार्षिक पाणीवापर ३६३ दशलक्ष घनमीटर आहे. नव्या फेरनियोजनानुसार सिंचनाचा एकूण पाणीवापर २१५.७० वरून २२७.०३० दशलक्ष घनमीटर केला आहे. यात कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजना क्रमांक १ व २ साठी ११.३३० दशलक्ष घनमीटर पाण्याची नव्याने तरतूद केली आहे.
बदल करण्याचे निर्देश
या मंजुरीसोबतच एकात्मिक जलआराखड्यात आवश्यक ते बदल करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन आणि शेंदुर्णी पाणीपुरवठा योजनेच्या पाणीवाटपाला सुधारित नियोजनात अधिकृत स्थान मिळाले आहे.
पाणीवापर ३६३ दशलक्ष घनमीटरच
शासन निर्णयातील परिशिष्टानुसार, वाघूर प्रकल्पाचा एकूण वार्षिक पाणीवापर ३६३ दशलक्ष घनमीटर कायम ठेवला आहे. नव्या नियोजनात सिंचनासाठी २२७.०३० दशलक्ष घनमीटर पिण्याच्या पाण्यासाठी ६३.२६०, औद्योगिक वापरासाठी ९.७८० आणि बाष्पीभवनासाठी ६२.९३० दशलक्ष घनमीटर पाण्याची तरतूद आहे. भविष्यातील गरजांसाठी राखीव असलेले १३.८०० दशलक्ष घनमीटर पाणी या फेरनियोजनात पूर्णपणे समायोजित केले आहे.
---
कोट
वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याने झालेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. याला मुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मान्यता दिल्याचे समजते. लवकरात लवकर ई-टेंडरिंग काढून निविदा प्रसिद्ध करून शेती सिंचनासाठी योजनेच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. शेताच्या बांधावर पाणी येणार नाही, तोपर्यंत पाणी हक्क समिती आपली आंदोलनाची दिशा ठरवत राहील.
-सुधाकर बडगुजर,
कार्यकर्ते, शेतकरी पाणी हक्क समिती, कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ