(संबंधित संग्रहित चित्र वापरावे)
---
ज्येष्ठ नागरिकांसाठी १ नोव्हेंबरला ‘वॉक फॉर स्वास्थ्यम्’
उपशीर्षक
‘सकाळ’तर्फे वॉकथॉनचे आयोजन; तीन किलोमीटर चालत देणार आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांना निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीची प्रेरणा मिळावी, तसेच नियमित चालण्याचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वॉक फॉर स्वास्थ्यम्’ या विशेष उपक्रम १ नोव्हेंबरला सकाळी ६ ते ९ या वेळेत काव्यरत्नावली चौकात होणार आहे.
वाढत्या वयानुसार आरोग्याची काळजी घेणे आणि दैनंदिन जीवनात शारीरिक हालचालींना महत्त्व देणे आवश्यक असते. नियमित चालण्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यास मदत होते. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सक्रिय जीवनशैलीसाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
‘वॉक फॉर स्वास्थ्यम्’ अंतर्गत तीन किलोमीटरचे वॉकथॉन होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन उत्साहाने सहभागी होता यावे, परस्परांशी संवाद साधता यावा आणि आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी हा उपक्रम होणार आहे. आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नसून निरोगी समाजनिर्मितीसाठीही ती महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी नियमित चालण्याची सवय जोपासावी आणि आनंदी जीवनासाठी आरोग्याला प्राधान्य द्यावे, हा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
जळगाव शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या वॉकथॉनला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’ने केले आहे.
चौकट
वैयक्तिक, तसेच समूह नोंदणीची सुविधा
वॉकथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी ईश्वर पाटील (मो. ९८२३८५७८५७) यांच्याशी संपर्क साधून आपली वैयक्तिक किंवा समूह नोंदणी करावी. ज्येष्ठ नागरिक संघ, हास्य क्लब, तसेच इतर सहयोगी संस्थांमार्फतही समूह नोंदणी करता येणार आहे. या संस्थांच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र वैयक्तिक नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.