मेन फिचर
मालेगावला युद्ध स्मारक उभारणीसाठी
४ कोटी निधीला प्रशासकीय मान्यता
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १७ : शहरात युद्ध स्मारक (शहीद स्मारक) उभारण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे या स्मारकाच्या बांधकामासाठी ४ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. स्मारकाच्या माध्यमातून वीर जवानांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचणार आहे.
तालुक्यातील माजी सैनिक, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून शहरात युद्ध स्मारक उभारण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीच्या अनुषंगाने मंत्री भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे स्मारक उभारणीसाठी ४ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कॅम्प परिसरात सर्व्हे क्रमांक ४६ मधील एकूण ४.९८ हेक्टर क्षेत्रापैकी २ हेक्टर जागा युद्ध स्मारकासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावित युद्ध स्मारक परिसरात शहीद जवानांची माहिती, स्मृतीस्तंभ, ध्वजस्तंभ, प्रेरणादायी दालन आणि उद्यान उभारण्याचे नियोजन आहे. तसेच नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य अनुषंगिक उपक्रमासाठी आवश्यक सुविधाही विकसित करण्यात येणार आहेत.
देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन करणे आणि त्यांच्या त्यागाची स्मृती भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविणे हा युद्ध स्मारक उभारणीचा प्रमुख उद्देश आहे. स्मारकामुळे शहराच्या वैभवात भर पडण्यासोबतच युवकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रसेवा आणि सैनिकांविषयी आदराची भावना दृढ होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचे माजी सैनिक व नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.