वेध प्रभागाचा
---
प्रभाग क्र. १३
(गावठा-मारुती मंदिर, नवजीवन डे स्कूल, वरंदळ मळा, पवार शाळा, शिवाजीनगर, पांडवनगरी)
---
प्रभाग १३ मध्ये जुन्या सरदवाडी रस्त्याची दुरवस्था
२५ वर्षांपासून डागडुजी नाही; खुल्या भूखंडांवरील कचरा, वीजतारांचे जाळे, कॉलनी रस्त्यांचे प्रश्न कायम
संपत ढोली ः सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ८ ः गावठा भागापासून ते पवार शाळेपर्यंत, उन्नती क्लासेसपासून ते नवजीवन डे स्कूलपर्यंतचा परिसर प्रभाग क्रमांक १३ मध्ये येतो. मूळ शहर आणि उपनगरे अशी प्रभागाची रचना असल्याने शहर आणि उपनगरांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. जुना सरदवाडी मार्ग वाहतुकीयोग्य राहिला नसून, हा प्रश्न नागरिकांना सर्वाधिक भेडसावतो आहे. त्यातच खुले भूखंड विकसित नसल्याने त्यांच्या विकासाचीही मागणी आहे.
प्रभागातील दत्तमंदिरमार्गे जाणाऱ्या जुन्या सरदवाडी रोडची समस्या मोठी आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे, त्यातच पावसाळ्यात या मार्गाला येणारे तलावाचे स्वरूप यामुळे हा मार्ग आहे की तलाव, असा प्रश्न नागरिकांना पडतो. हा मार्ग तसा सर्वाधिक जुना आहे. २५ वर्षांपासून या मार्गाची साधी डागडुजीही झालेली नाही. उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने रहदारीही मोठीही आहे. तथापि, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने या मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाची मागणी होत आहे.
गावठा भागात वीजतारांचे जाळे, रस्त्यांचे प्रश्न सर्वाधिक आहे. हा मूळचा शहराचा भाग असल्याने रस्ते व वीज ही मोठी समस्या या परिसराची आहे. या भागात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. काही भागात रस्ते अजून होणे बाकी आहे. घरांच्या जवळून जाणाऱ्या वीजतारांनी मात्र रहिवाशांचा जीव धोक्यात आहे. शिवाजीनगर परिसरात खुल्या भूखंडांना बकाल स्वरूप आले आहे. त्यांची स्वच्छता, विकास करण्याची मागणी आहे. वरंदळ मळ्यात खुल्या भूखंडावर कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पांडवनगरी, वरंदळ मळ्यात कॉलनी रस्ते होणे अजून बाकी आहे. शिवाजीनगरातील पाण्याच्या टाकीला गळती आहे. ती नव्याने उभारण्याची गरज आहे.
पवार शाळा मार्गाचे काँक्रिटीकरण
वरंदळ मळा, शिक्षक कॉलनीतील बहुतांश रस्ते, सांडपाणी व्यवस्था चांगली आहे. प्रभागातील सर्वाधिक महत्त्वाचा रस्ता म्हणून पवार शाळा मार्गाकडे पाहिले जाते. हा मार्गाची दुरवस्था झाली होती. हा मार्ग काँक्रिटीकरण केल्याने उपनगरांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या मार्गाने परिसराचे रुप बदलले आहे. शिक्षक कॉलनीकडे जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. बालाची कॉलनीत रस्त्याचे काम सुरू आहे. प्रभागात दोन ट्रान्स्फॉर्मर नव्याने बसविल्याने वीज समस्या सुटण्यास मदत झाली आहे.
---
प्रभागासाठीचे नियोजित प्रस्ताव
- जुना सरदवाडी मार्ग काँक्रिटीकरण मंजूर
- पांडवनगरी, हुसेनबाबा नगरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण
- शिवाजीनगर जलकुंभाची नव्याने उभारणी
- पवार शाळा ते पाचोरे मळा शिवनदीवर पूल उभारणी
---
नगरसेवक काय म्हणतात ः
प्रभागातील जुना सरदवाडी मार्ग काँक्रिटीकरण होणार आहे. दिवाळीनंतर हे काम सुरू होऊ शकेल. अनेक वर्षांचा हा प्रश्न मार्गी लागणार आहे. इतर रस्ते मंजुरीस आहेत.
- अमोल झगडे, नगरसेवक
सरदवाडी मार्गाचे काम सुरू होणार आहे. इतर मूलभूत प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. नागरिकांनी दुष्काळाचा विचार करता पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
- गीता वरंदळ, नगरसेवक
---
नागरिक काय बोलतात ः
पाण्याचे नियोजन व्हावे. पाण्याची वेळ, दिवस निश्चित नाही. त्याचे नियोजन व्हावे. खुल्या भूखंडांना बकाल स्वरूप आले आहे. ते विकसित होणे गरजेचे आहे.
- एस. बी. देशमुख,
रहिवासी, शिक्षक कॉलनी
---
सरदवाडी मार्गाचे काँक्रिटीकरण करावे. सरदवाडी मार्गाकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. त्याचे काँक्रिटीकरण होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून राहते. या प्रश्नाची सोडवणूक व्हावी.
- हरिओम क्षत्रिय,
रहिवासी संदेश कॉलनी
---
(उद्याच्या अंकात ः प्रभाग क्र. १४ - शांतीनगर, यशवंनगर, झापवाडी, वृंदावननगर, वीर सावरकर नगर)
---
फोटो क्र. १ ) सिन्नर ः दत्त मंदिराजवळील जुन्या सरदवाडी मार्गाची झालेली दुरवस्था. दुसऱ्या छायाचित्रात वरंदळ मळ्यात शिक्षक कॉलनीत झालेले सिमेंट काँकिटचे रस्ते.
---
- अमोल झगडे
- गीता वरंदळ
- हरिओम क्षत्रिय
- एस. बी. देशमुख०