जुने नाशिक- तपोवन परिसरातील लोकेश लॅमिनेटेड प्लायवूड दुकानाच्या गुदामाला भीषण आग लागली. आगीत सुमारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी उशिरापर्यंत काही भागात आग सुरू होती. अग्निशामक विभागाच्या बंबाने आग विझविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. नाशिक शहरासह पिंपळगाव, मालेगाव, एमआयडीसी अशा १६ बंबांच्या सुमारे १२० फेऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.