वऱ्हाणेत वाहनाच्या धडकेत
दुचाकीस्वाराचा मृत्यू
मालेगाव : वऱ्हाणे शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर जितो वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अनिल भास्कर कदम (वय ३५, रा. मांजरे) असे मृताचे नाव आहे. कदम हे सीडी डिलक्स दुचाकीने (एमएच ४१ एल ६५३) मालेगाव-मनमाड रस्त्याने मांजरे येथे घरी जात होते. २ ऑक्टोबरला रात्री साडेआठला पेट्रोल पंपासमोर दूध घेऊन जाणाऱ्या जितो वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कदम यांच्या डोक्याला, पायाला, चेहऱ्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सुनील भास्कर कदम (वय ३८, रा. मांजरे) यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात जितोचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. चालकाचे नाव व गाव समजू शकले नाही.
दुचाकीच्या धडकेत
पादचारी गंभीर जखमी
मालेगाव : हिंगलाजनगरातील रस्त्यावर दुचाकीने पादचाऱ्यास पाठीमागून धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. विजय रमेश शिंदे हे हिंगलाजनगरातील गल्लीतून कामावर जात होते. त्यावेळी होंडा युनिकॉर्न दुचाकीने (एमएच ४१ बीवाय २९६३) त्यांना धडक दिली. या अपघातात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत भारत रमेश शिंदे (वय ३६, रा. चंद्रमनीनगर) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. दुचाकीस्वाराचे नाव व गाव समजू शकले नाही.
जुन्या वादातून
एकास मारहाण
मालेगाव : जाफरनगरातील पाटकिनारा रस्त्यावर जुन्या भांडणाची कुरापत काढून एकास धारदार हत्याराने मारहाण केल्याची घटना घडली. साजीद अहमद बरकत उल्ला (वय ४३) असे जखमीचे नाव आहे. सैफ सामिकचा लहान भाऊ व सईद अहमद जहीर अहमद (दोघे रा. जाफरनगर) यांनी साजीद यांना जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. साजीद समजावून सांगत असताना सैफ सामिकच्या लहान भावाने धारदार हत्याराने त्यांच्या उजव्या मांडीवर वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. सईद अहमद याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या भांडणात साजीद यांचा मोबाईल व खिशातील पैसे गहाळ झाले. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.