टुडे एक, मेन फिचर
----
महापालिका इमारतीचा फोटो व नळाचे स्केच वापरता येईल
----
नळ जोडणीचा मक्ता संपल्याने ७०० नागरिक प्रतीक्षेत
उपशीर्षक
चारही प्रभाग समित्यांतील काम ठप्प; नवीन कंत्राटासाठी १५ दिवसांत निविदा प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : शहरात नवीन घर बांधल्यानंतर पाणीपुरवठ्याची सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. नवीन नळ जोडणीचे काम करणाऱ्या मक्तेदाराचा मक्ता दोन महिन्यांहून अधिक काळापूर्वीच संपुष्टात आल्याने शहरातील चारही प्रभाग समित्यांमधील नळ जोडणीचे काम ठप्प झाले आहे. पावती भरूनही १०० हून अधिक अर्ज प्रलंबित असून, नवीन नळ जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या ७०० च्या पुढे गेल्याची माहिती आहे. दुसरीकडे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात केल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे.
शहरात नवीन घरे बांधणाऱ्या नागरिकांसह जुन्या घरांमध्ये नवीन नळ जोडणी घेऊ इच्छिणाऱ्यांना सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नळ जोडणीसाठी आवश्यक शुल्क भरून अर्ज केल्यानंतरही प्रत्यक्ष जोडणी मिळत नसल्याने नागरिक प्रभाग समिती कार्यालयांमध्ये वारंवार चकरा मारत आहेत. नवीन मक्ता मंजूर झाल्यानंतरच नळ जोडणीचे काम सुरू होईल, असे उत्तर संबंधित कार्यालयांकडून दिले जात आहे. त्यामुळे शुल्क भरूनही नागरिकांना पाण्याच्या जोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
नळ जोडणीसाठी धावपळ
यंदा दुष्काळाचे सावट असल्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात कपात केली आहे. त्यानुसार पाणीपुरवठ्याची वेळ १५ मिनिटांनी कमी करण्यात आली आहे. सध्या पाण्याची उपलब्धता आणि पुरवठ्याचे नियोजन यांचा ताळमेळ घालण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यातच उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने नवीन नळ जोडणीसाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे.
‘निविदा तातडीने राबवा’
दरम्यान, नवीन नळ जोडणीचा मक्ता देण्यासाठी आयुक्त आदित्य जिवने यांनी पाणीपुरवठा विभागाला निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विभागाकडून निविदा प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत नवीन नळ जोडणीच्या कामासाठी मक्ता देण्याची निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता योगेश बोरोले यांनी दिली. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होते, याकडे नळ जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चौकट
जूनमध्येच निधी संपला..
मनपाने ऑक्टोबर २०२४ ते ऑक्टोबर २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन नळ जोडणी आणि पाणीपुरवठा दुरुस्तीच्या कामांसाठी सुमारे चार कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. या निधीतून दोन हजार नवीन कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात जून २०२६ पर्यंत उद्दिष्टापेक्षा अधिक, म्हणजे तब्बल पाच हजार नवीन नळ कनेक्शन देण्यात आले. परिणामी, ऑक्टोबरमध्ये संपणारा निधी जूनमध्येच संपुष्टात आला. ठेकेदाराचा निधी संपल्यामुळे नवीन कनेक्शन देण्याचे काम अचानक ठप्प झाले होते. त्यानंतर पुन्हा काम सुरू झाले; मात्र मक्त्याची मुदत संपल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हे काम पुन्हा बंद झाले आहे.