दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणावर भर
जिल्हा प्रशासन : ‘जी राम जी’तून ६४ हजार ५२७ कामे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत रोजगार निर्मितीला चालना देताना जलसंधारणावर भर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. प्रशासनाने ‘जी राम जी’ योजनेत ६४ हजार ५२७ कामांचा आराखडा तयार केला. या कामांमध्ये ६१ हजार २२५ जलसंधारणाची कामे असून, उर्वरित दुष्काळ प्रतिबंधक स्वरूपाची आहेत.
जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीला तोंड देताना ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी ‘जी राम जी’ योजनेंतर्गत आराखडा तयार केला. या आराखड्यात जलसंधारण, भूजल फेरभरण, पाणीसाठा वाढविणे, शेतजमिनीची उत्पादकता वाढविणे आणि ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणाऱ्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रशासनाने जलसंधारणाच्या कामांत माती, नाला व सिमेंट बांध, दगडी व भूमिगत बांध, गॅबियन बंधारे, नदी व तलावांचे पुनरुज्जीवन, शेततळी, वनतळी, सलग समतल चर (सीसीटी), शोषखड्डे, विहिरींचे फेरभरण आणि पावसाचे पाणी साठविण्यासाठी विविध कामांचा समावेश आहे. या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन भूजलपातळी वाढण्यास आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास हातभार लागेल.
तालुकानिहाय कामांचे नियोजन
विविध तालुक्यांत स्थानिक गरजा आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत कामांचे नियोजन करण्यात आले आहे. मालेगावमध्ये २२ हजार पाच कामे प्रस्तावित असून, त्यापैकी २० हजार कामे जलसंधारणाची आहेत. दिंडोरी तालुक्यात पाच हजार २७६, त्र्यंबकेश्वर पाच हजार १६५, बागलाण चार हजार ७००, सिन्नर चार हजार १५०, येवला चार हजार ८५, नांदगाव तीन हजार ७०७, कळवण तीन हजार ४१५, पेठ तीन हजार २७६, देवळा दोन हजार ३४१, निफाड एक हजार ९७६, सुरगाणा दोन हजार ४६९, इगतपुरी दोन हजार ४४८, चांदवड दोन हजार ५६५, तर नाशिक तालुक्यात ६७० कामे प्रस्तावित आहेत.
पायाभूत सुविधांना बळ
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्धता, शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांबरोबर शेतजमिनीची पाणीधारण क्षमता वाढविणे, जमिनीची धूप रोखणे, पाण्याचा कार्यक्षम वापर व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धनावर भर देण्यात येईल. ग्रामीण भागात मजुरांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणे हा या नियोजनाचा महत्त्वाचा उद्देश आहे.