राम भदाणे : KPD26B13532
----------
जलतारासह शोषखड्ड्यास
गती द्या : आमदार भदाणे
कापडणे, ता. १९ : धुळे तालुक्यात विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानातून (ग्रामीण) धुळे ग्रामीणमध्ये जलसंधारणाची चळवळ अधिक गतीमान करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत शेतकरी व नागरीकांनी शेतात जलतारा खड्डा आणि घराशेजारी शोषखड्डा करावा, पाणी संवर्धनास गती देण्याचे आवाहन आमदार राम भदाणे यांनी केले आहे.
आमदार भदाणे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे. भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत असताना केवळ सरकारी योजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक शेतकरी आणि कुटुंबाने पुढाकार घेतला पाहिजे. शेतात जलतारा खड्डा मारल्याने अनेक फायदे होतात. शेतातील पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरते. भूजल पातळी वाढते. रब्बी हंगामात शेत पिकांना ओलावा उपलब्ध होतो. मातीची धूप कमी होते. शाश्वत शेतीसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. कमी खर्चात आणि मनरेगा अंतर्गत मजुरीतून हा खड्डा शेतात तयार करता येतो. त्याचप्रमाणे घरातील सांडपाण्याचा योग्य निचरा होणेही तितकेच महत्वाचे आहे. यासाठी घराशेजारी शोषखड्डा हा उत्तम उपाय आहे.
घरातील वापरलेले पाणी जमिनीत मुरल्याने परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहतो. साचलेल्या पाण्यामुळे होणारी डासांची पैदास कमी होते. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना आळा बसतो. भूजल पातळी सुधारते आणि पर्यावरण संवर्धनास मदत होते. आमदार भदाणे म्हणाले, धुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या कामांची नोंदणी सुरू आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा.