टुडे पान एक सेकंड मेन
---------------
33310
नंदुरबार : आढावा बैठकीत बोलताना आमदार डॉ. विजयकुमार गावित. समवेत डॉ. हीना गावित, डॉ. सुप्रिया गावित, आशा संघवी, बंडू कापसे, चंद्रकांत पवार आदी.
--------------
जिल्ह्यातील ६२२ गावांत ठोस उपाययोजना राबवा
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर डॉ. विजयकुमार गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २२ : जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच ६२२ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवणार आहे. पाणीटंचाईच्या या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना हाती घ्या, अशा सूचना माजी मंत्री, आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी प्रशासनास दिल्या.
डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झालेल्या संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठकीत आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रशासनाने तयार केलेला कृती आराखडा आणि गावांमधील संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती उपस्थित गावांमधील सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांच्याकडून जाणून घेतली. बैठकीला माजी खासदार डॉ. हीना गावित, भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यादेखील उपस्थित होत्या.
जिल्ह्यात यंदा पावसात ५० टक्के घट झाल्याने भूजल पातळी खोल गेली आहे. त्यामुळे आत्तापासूनच काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात ही टंचाईची तीव्रता वाढत जाणार आहे. या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात धडगाव, शहादा आणि नंदुरबार या तालुक्यातील गावांची संख्या अधिक आहे. यातील १०० हून अधिक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, असा शासकीय अंदाज आहे.
या अहवालावरून डॉ. गावित यांनी प्रगतिपथावर असलेल्या जलजीवन मिशन योजना तातडीने पूर्ण करा, निधी अभावी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी योग्य पाठपुरावा केला जावा. हातपंप निर्माण करणे, विहिरी अधिग्रहित करणे यासारखे उपाय वेगाने राबवा अशा सूचना दिल्या.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, प्रांताधिकारी बंडू कापसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपजिल्हाधिकारी देवगुणी, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, तहसीलदार संतोष ढेरे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील सर्व खाते प्रमुख, महावितरण अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी आदींसह गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.