ऐन हिवाळ्यात १३१ गाव-वाड्यांना टंचाईच्या झळा
जिल्ह्यात ४३ टँकरने भागतेय ८४ हजार नागरिकांची तहान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : ऐन हिवाळ्यातच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अपुऱ्या पावसामुळे चार तालुक्यांतील ४२ गावे आणि ८९ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या १३१ गाव-वाड्यांतील ८४ हजार ५०२ नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाला ४३ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही स्थानिक पातळीवर अपुऱ्या पावसामुळे नोव्हेंबरच्या मध्यातच पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. देवळा, चांदवड, मालेगाव आणि येवला या चार तालुक्यांतील ग्रामीण भागाला त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने अनेक गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून सध्या ४३ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, दिवसभरात या टँकरच्या ८० फेऱ्या होत आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने १४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यापैकी एक विहीर गावासाठी राखीव ठेवण्यात आली असून, उर्वरित १३ विहिरींमधून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे.
दरम्यान, डिसेंबरमध्ये एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाढते तापमान आणि पाण्याची घटती उपलब्धता यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन मागणीनुसार टँकर उपलब्ध करून देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची सद्यःस्थिती
तालुका गावे-वाड्या टँकर
चांदवड..........०९..........०५
देवळा..........२०..........०३
मालेगाव..........२०..........०६
येवला..........८२..........२९
एकुण..........१३१..........४३