टुडे एकवर : शहर टुडे (या बातमीचा वाढावा शहर पान चारवर देता येईल)
---
सेकंड मेन
--
(आमदार सुरेश भोळे यांचा संग्रहित फोटो वापरावा)
----
‘वॉटर ग्रेस’ला पुन्हा आणण्याचे षड्यंत्र
आमदार भोळे यांचा आरोप; आयुक्तांनी कोणाच्याही दबावाखाली काम करू नये
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : शहरातील स्वच्छतेचा मक्ता घेतलेल्या बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वेतन थकल्याने काम बंद आंदोलन केल्यानंतर शहरात ठिकठिकाणी कचरा साचला होता. या पार्श्वभूमीवर, बीव्हीजी कंपनीला शहरात व्यवस्थित काम करू दिले जात नसून, पूर्वीच्या वॉटर ग्रेस कंपनीला पुन्हा आणण्यासाठी महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांकडून षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला. महापालिका आयुक्तांनी कोणाच्याही दबावाखाली काम न करता जनहिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या जी.एम. फाउंडेशन कार्यालयात शनिवारी (ता. १७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर दीपमाला काळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उदय भालेराव, विशाल त्रिपाठी, जयंत भावसार उपस्थित होते. आमदार भोळे म्हणाले, की शहरातील कचरा, बंद पथदिवे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नागरिक लोकप्रतिनिधींना जाब विचारत आहेत. महासभेत ठराव होऊनही पथदिव्यांसाठी शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीचे काम सुरू करण्यास महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. बीव्हीजी कंपनीची अनामत रक्कम महापालिकेकडे असताना आणि पंधराव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध असतानाही कंपनीची बिले का थकविण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काम करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना कंपनीची बिले अडविण्यामागे कोणाचा दबाव आहे, याचे स्पष्टीकरण मिळायला हवे, असेही ते म्हणाले.
वॉटर ग्रेससाठी खटाटोप?
बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम बंद करण्यासाठी भडकावले जात असल्याचा तसेच काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून कंपनीच्या कामाबाबत वारंवार तक्रारी केल्या जात असल्याचा आरोप भोळे यांनी केला. कंपनीला व्यवस्थित काम करू न देता तिच्या कामात अडथळे निर्माण केले जात असल्याचा दावा करत, वॉटर ग्रेस कंपनीला पुन्हा आणण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे ते म्हणाले. या आरोपांतून त्यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाच लक्ष्य केले.
भूसंपादन प्रकरणांची चौकशी होणार
महापालिकेतील भूसंपादन प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोपही आमदार भोळे यांनी केला. जागांचे चुकीचे मूल्यांकन करून जनतेचे कोट्यवधी रुपये ठरावीक भूमाफियांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली असून, लवकरच चौकशी सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
कोट
आम्ही कोणाच्याही दबावाखाली काम करत नसून जनतेच्या हितासाठी काम करत आहोत. पहिल्याच महासभेत जनतेच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले तरी चालेल, अशी मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. शहरातील स्वच्छतेचे काम चांगले व्हावे, यासाठी बीव्हीजी कंपनीला काम करण्यास सांगितले जात आहे. यापूर्वी ईएसएल कंपनीच्या पथदिव्यांच्या कामाचा अनुभव शहराने घेतला आहे. त्यामुळे भविष्यात अशा अडचणी उद्भवू नयेत, यासाठी काही अटी-शर्तींमध्ये बदल सुचविले आहेत. ते कंपनीने मान्य करावेत.
- आदित्य जिवने, आयुक्त महापालिका.