टूडे साठी महत्वाचे
-----------
पंधरा दिवसात जलमापक बदला, अन्यथा दुप्पट पाणीपट्टी
२,१५१ नळजोडणीधारकांना इशारा; ४४ टक्के पाण्याचा हिशोबच लागेना
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २१ : महापालिकेने जलमापक नसलेल्या व सदोष जलमापक असलेल्या दोन हजार १५१ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. दंडाची रक्कम अदा न केल्यास पंधरा दिवसानंतर दुप्पट पाणीपट्टी आकारले जाणार आहे. पाण्याची वाढती गळती व प्राप्त होणारा महसुलाचा विचार करून हिशोबबाह्य पाण्याचे महापालिकेने लेखा परिक्षण केले. त्यात ढोबळमानाने देयके अदा करणे व जलमापक नसल्याचे आढळून आले.
पाणीपुरवठा विभागाने केलेल्या खासगी सर्वेक्षण संस्थेच्या माध्यमातून ४४ टक्के पाण्याचा हिशोब लागत नसल्याचे स्पष्ट झाले. यातून जवळपास वार्षिक सरासरी ५० कोटींचा तोटा आढळून आला. पाण्याचे देयके ग्राहकांना वेळेत उपलब्ध होत नव्हते, त्याला मनुष्यबळ नसल्याचे कारण समोर आले. त्यामुळे तीनशे कोटी रुपयांपर्यंत थकबाकी पोचली. पाणीपट्टी देयके आउटसोर्सिंगच्या माध्यमातून वाटप करण्यासाठी क्रॅनबेरी या खासगी मक्तेदार कंपनीला काम देण्यात आले. त्यापूर्वी नळजोडण्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शहरातील दोन लाख ४० हजार १७० नळ कनेक्शनची तपासणी करण्यात आली. यात ७४ हजार ४६३ नळ कनेक्शनवरील जलमापक नियमानुसार सुस्थितीत आढळून आले, तर १ लाख ६५ हजार ७०७ नळकनेक्शन धारकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. त्यानुसार आता कारवाई सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात जलमापक नसलेल्या, सदोष जलमापक असे एकूण २,१५१ नळजोडणीधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
-------------------
अशाप्रकारे बजावल्या नोटिसा (आकारनिहाय)
- अर्धा इंची- १,३४६
- पाऊण इंची- १०१
- एक इंची- ६३१
- दीड इंची- ३३
- दोन इंची- २५
- तीन इंची- १
- चार इंची- १३
- सहा इंची- १
---------चौकट
सातपूर विभागात सर्वाधिक नोटिसा
सातपूर विभागात सर्वाधिक ४५३ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल पूर्व विभागात ४०९, नाशिक रोड विभागात ४०५, पंचवटी विभागात ३५०, सिडको विभागात ३०८, पश्चिम विभागात २२६ असे एकूण २,१५१ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
----------------