निमशहरी भागात दहा टक्के पाणी कपात
दुष्काळाचे संकट : जिल्हा प्रशासनाचे नगरपालिकांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये दहा टक्के पाणी कपात लागू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शहरासाठी उपलब्ध होणाऱ्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करताना तत्काळ पाणीकपात केली जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत.
चालुवर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट दाटले आहे. सरकारने पंधरापैकी तब्बल १३ तालुके दुष्काळी घोषित करताना तेथे बारा प्रकारच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. या योजना लागू करतानाच धरणांमधील पाण्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करावे. तसेच धरणात पाण्याचा दहा टक्के बफर साठा ठेवतानाच शहरी व निमशहरी भागांमध्ये १० टक्के पाणी कपात करावी असे सरकारचे आदेश आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने पावले उचलली आहेत.
जिल्ह्यात ११ नगरपालिका तसेच सहा नगरपंंचायती आहेत. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात दहा टक्के पाणी कपात लागू करावी, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाचे सहआयुक्त श्याम गोसावी यांनी दिली. तसेच संभाव्य दुष्काळाचे संकट लक्षात घेता पाण्याच्या योग्य नियोजन करावे. नागरिकांमध्ये पाण्याच्या वापराबाबत जनजागृती करताना कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय होणार नाही, या संदर्भात दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे गोसावी यांनी सांगितले.
पाणी जपून वापरावे
जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी तयारी सुरु केली आहे. या तयारीचा भाग म्हणून ग्रामीण भागात टँकरने पाणी पुरवठ्यासह नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती व इतर उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. येणारे संकट लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करताना पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.