पाण्याअभावी ३०० फळझाडांवर चालवली कुऱ्हाड!

पाण्याअभावी ३०० फळझाडांवर चालवली कुऱ्हाड!
Published on: 
(पान ४ ला मेन) WRS26B02894 कावठे : (ता. साक्री): शिवारात पाणीटंचाईमुळे वाळलेल्या फळझाडांची तोडलेली उभी असलेली खोड. -------- पाण्याअभावी ३०० फळझाडांवर कुऱ्हाड! कावठे शिवारातील शेतकऱ्याची हृदयद्रावक व्यथा; कुटुंब आर्थिक संकटात सकाळ वृत्तसेवा वार्सा, ता. २७ : वर्षानुवर्षे घाम गाळून उभी केलेली फळबाग डोळ्यांदेखत वाळून जात असल्याचे दुःख आणि ती वाचवण्यासाठी पाण्याचा एकही स्रोत उपलब्ध नसल्याची हतबलता... अखेर जिवापाड जपलेल्या झाडांवरच कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. साक्री तालुक्यातील कावठे शिवारात तीव्र पाणीटंचाईमुळे निंबाजीराव झिपरू देवरे यांची आंबा, नारळ, चिकू, चिंच आणि फणसाची सुमारे ३०० झाडे असलेली फळबाग उद्ध्वस्त झाली आहे. उत्पन्नाचे प्रमुख साधनच नष्ट झाल्याने देवरे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. ------ कावठे शिवारातील गट क्रमांक ५५६ आणि ५५७ मधील एकूण २.१४ हेक्टर क्षेत्रावर ही फळबाग होती. अश्विनी, स्वाती आणि हर्षल देवरे यांच्या नावे असलेल्या या शेतजमिनीत निंबाजीराव देवरे यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीतून विविध फळझाडे वाढवली होती. या बागेतून मिळणारे उत्पन्न हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन होते. मात्र, पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईने या बागेवरच घाला घातला. विहीर आटली, बोअरवेलही कोरडी बागेला पाणी देण्यासाठी असलेली सुमारे ६० फूट खोल विहीर पूर्णपणे आटली आहे. तर तब्बल ५०० फूट खोल बोअरवेलमध्येही पाणी शिल्लक राहिलेले नाही. पाण्याचे दोन्ही स्रोत बंद पडल्याने झाडांना जगवायचे कसे, असा प्रश्न देवरे यांच्यासमोर उभा राहिला. पाण्याअभावी झाडांची पाने पिवळी पडून वाळू लागली, तर फळांची वाढही खुंटली. बाग वाचविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर अखेर नाइलाजाने झाडे तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. पर्यायी पिकांचाही मार्ग बंद फळबाग तोडल्यानंतर त्या क्षेत्रात गहू किंवा कांद्यासारखे हंगामी पीक घेण्याचा पर्यायही देवरे यांनी विचारात घेतला. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने पर्यायी पीक घेणेही कठीण झाले आहे. त्यामुळे बागेचे नुकसान होण्याबरोबरच आगामी हंगामातील उत्पन्नाची आशाही मावळली आहे. नुकसानभरपाईची मागणी कावठे शिवारातील या नुकसानीची महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, तसेच शासनाच्या निकषांनुसार बाधित शेतकरी कुटुंबाला नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भविष्यात अशा संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना आणि पाणीटंचाईग्रस्त क्षेत्रांसाठी ठोस नियोजन करण्याचीही गरज आहे. अनेक वर्षांच्या कष्टांतून फुलवलेली बाग पाण्याअभावी तोडण्याची वेळ येणे, हे दुष्काळाच्या तीव्रतेचे विदारक चित्र आहे. आता तरी प्रशासनाने या शेतकरी कुटुंबाच्या व्यथेची दखल घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. ----- शेतातील विहीर आणि बोअरवेल दोन्ही कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचा एकही स्रोत शिल्लक नसल्याने फळबाग जगवता आली नाही. आता साधे पीक घेणेही शक्य होईल की नाही, याची चिंता आहे. - निंबाजीराव देवरे, शेतकरी -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com