पान तीन ॲंकर
-------
तालुक्यात जलसंधारणासाठी विहिरींच्या कामांना मिळावी गती
येवल्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत उपाययोजनांची गरज
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.२१ : कमी पर्जन्यमान,पावसाची अनिश्चितता आणि भूजल पुनर्भरणाच्या मर्यादित संधी यामुळे तालुक्यात पाणीटंचाईचे संकट दरवर्षी गडद होत आहे. या परिस्थितीत पाणीटंचाईसह शेती सिंचनाला आणि उपलब्ध करणाऱ्या उपायोजना या दुष्काळात हाती घेण्याची गरज आहे. विशेषत: ‘जी राम जी’ योजनेतून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक विहिरीं खोदकामांना चालना दिली तर नक्कीच त्याचा फायदा शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी होऊ शकेल. त्यामुळे विहिरींच्या कामांना मंजुरी देत कामे सुरू करण्याची गरज असल्याचे मत बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सुधीर जाधव यांनी व्यक्त केले.
तालुक्याचे वार्षिक सरासरी पाऊस सुमारे ४५३ मिलिमीटर असताना केवळ २४१ मिलिमीटर पाऊस झाला. त्यातच भूजल पातळी सातत्याने घटत असल्याने तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सातत्याने गंभीर बनत आहे. तालुका प्रामुख्याने अवर्षणप्रवण भागात मोडतो. तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असण्याबरोबरच त्याचे वितरणही असमान असते. जून-जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाने ओढ दिल्यास पिकांची वाढ खुंटते आणि जमिनीत पुरेसे पाणी मुरत नाही. यंदाही जून-जुलैमध्ये सुमारे १९८ मिलिमीटर, तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अवघा ५३ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आल्याने खरीप हंगामावर विपरीत परिणाम झाला.
तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाईची समस्या अधिक आहे. अनेक गावांमध्ये विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खाली गेली आहे, तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहे. येथील पाणीप्रश्न हा केवळ एखाद्या वर्षातील पावसाच्या तुटीपुरता मर्यादित नसल्याने भूजल पुनर्भरण, जलसाठ्यांचे नियोजन आणि पाण्याच्या शाश्वत वापरावर उपाययोजनेची गरज आहे.
विहिरींच्या कामांना मिळावी गती
तालुक्यात जलसंधारणाची छोटी मोठी सार्वजनिक कामे सुरू असतात. मात्र शेतकरी हिताचा विचार करता केंद्र सरकारच्या ‘जी राम जी’ योजनेतून पात्र लाभार्थ्यांना विहिरींच्या कामांसाठी मंजुरी दिल्यास ग्रामीण भागातील मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. योग्य ठिकाणी विहिरींची कामे केल्यास पाण्याची उपलब्धता वाढविण्यास मदत होऊ शकते.
तालुक्यातील स्थिती
- पावसाची तूट, भूजल पातळीतील घसरणीमुळे पाणीटंचाईचे संकट गडद.
- भूजल पातळीत अधिक घसरण,उत्तर-पूर्व पाणीटंचाईची तीव्रता अधिक
- विहिरींच्या कामांना तातडीने मंजुरी देण्याची गरज
- योजनेतून रोजगारनिर्मिती आणि पाण्याची उपलब्धता वाढविण्याची अपेक्षा
- जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि ठिबक सिंचनावर भर आवश्यक
- टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कायमस्वरूपी जलनियोजनाची गरज
- जी राम जी योजनेतून विहिरींच्या कामांतून रोजगारासह जलसुरक्षेला बळ देण्याची संधी.
येवला तालुका सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करतो, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. रोजगार हमी योजनेतून कृतीबद्ध कार्यक्रम राबवावा. प्रशासनाने जलसंधारण व भूजल पुनर्भरणाच्या कामांनाही प्राधान्य द्यावे.
-डॉ.सुधीर जाधव, माजी सभापती, बाजार समिती,येवला