फोटो ओळी-11209
नांदगाव : रविवारी केलेल्या दुरुस्तीनंतर सोमवारी पुन्हा फुटलेली मुख्य जलवाहिनी.
मालेगाव रस्त्यावर परवानगीविना खोदकाम
टेलिफोन कंपनीची निष्काळजी नागरिकांच्या मुळावर; जलवाहिनीला वारंवार गळती
नांदगाव, ता. १६ ः शहरातील मालेगाव रस्त्यावर टेलिफोन कंपनीकडून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामाचा फटका आता थेट नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याला बसत आहे. केबल टाकण्यापूर्वी संबंधित कंपनीने ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच पाणीपुरवठा विभागाची परवानगी घेतलेली नाही. त्यातच खोदकामापूर्वी जमिनीखालील जलवाहिन्या व इतर सुविधांचे मॅपिंग करण्यात आले नसल्याने मुख्य जलवाहिनी वारंवार फुटत आहेत. नियोजनशून्य खोदकामाचा परिणाम नागरिकांना पाणीटंचाईच्या स्वरूपात भोगावा लागत आहे. मुख्य जलवाहिनीला केबल टाकण्याच्या कामादरम्यान धक्का लागून ती नादुरुस्त झाली. मात्र, एका ठिकाणी गळती शोधल्यास दुसऱ्या ठिकाणी पुन्हा गळती सुरू होत असल्याने देखभाल व दुरुस्ती पथकाची दमछाक होत आहे. वारंवार होणाऱ्या या बिघाडांमुळे दुरुस्ती लांबत असून, महिन्यापासून विस्कळित झालेला पाणीपुरवठा अद्याप पूर्वपदावर आलेला नाही. शहरात केबल टाकण्याचे काम करताना संबंधित यंत्रणांची पूर्वपरवानगी घेणे, जमिनीखालील पाणीपुरवठा वाहिन्या, ड्रेनेज व इतर सुविधांचे मॅपिंग करणे आणि त्यानंतर सुरक्षितपणे खोदकाम करणे अपेक्षित असते. मात्र, या कामात निष्काळजी झाली आहे. संबंधित कंपनीने परवानग्या घेतल्या होत्या का, खोदकामापूर्वी जलवाहिनीचे अस्तित्व तपासले होते का, तसेच कामावर संबंधित विभागाचे नियंत्रण व देखरेख होती का, या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे गरजेचे आहे. एका बाजूला केबल खोदकामामुळे जलवाहिनीचे नुकसान, तर दुसऱ्या बाजूला जलवाहिनीवरील अतिक्रमणामुळे दुरुस्तीचा पेच, अशा दुहेरी संकटात पाणीपुरवठा विभाग सापडला आहे. त्यामुळे दुरुस्तीला विलंब होण्याची शक्यता असून, नागरिकांची पाण्यासाठीची प्रतीक्षा वाढणार आहे. खासगी कंपनीच्या कामामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनीची जबाबदारी निश्चित करावी. जलवाहिनीची कायमस्वरूपी दुरुस्ती, अतिक्रमणाचा अडथळा दूर करणे आणि पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करणे आवश्यक आहे. निष्काळजीपणाची किंमत नागरिकांना आणखी किती दिवस मोजावी लागणार, असा संतप्त सवाल मालेगाव रस्त्यावरील रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.
............