मेन फिचर
कसमादे जलसाठ्यातील चोरी रोखण्याचे आव्हान
-------------------------------------
चोऱ्या थांबविण्यासाठी वीज कनेक्शन तोडण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर,ता २ : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गाव, वाड्या वस्त्यांवर आतापासूनच ऐरणीवर आला असताना कसमादेतील गुगुळवाड सारख्या काही ठिकाणी पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी चिंतेत भर घालणाऱ्या आहेत. गाव पातळीवरील सार्वजनिक सर्व जलसाठे सुरक्षित करण्यासाठी व्यापक व ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
धरणांतील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल यासाठी पाणी जपून वापरावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाची ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीसाठी पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखड्यात ७७७ गावे आणि १ हजार २८० वाड्यांचा समावेश आहे.
गुगुळवाडी पाणीचोरीने चर्चा
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २ हजार ९०६ उपाययोजना प्रस्तावित आहेत. गिरणा, चणकापूर, पुनंद, हरणबारी आणि केळझर या धरणांतील पाणीसाठा उपयोगी ठरेल. मात्र अनेक ठिकाणी गाव पातळीवरील उपलब्ध जलसाठ्यातून रात्री अपरात्री पाणी चोरी होत आहे. गुगुळवाड ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे गावानजीकच्या तलावातील पाणी चोरी रोखली गेली. कसमादेत अनेक ठिकाणी सार्वजनिक तलाव, पाझर तलाव व जलसाठ्यातील पाणी वीज पंपांच्या सहाय्याने विहिरीत आणले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच दुष्काळ स्थितीत पाणीचोरीच्या गंभीर विषयांचे महत्व अधोरेखीत होत आहे.
गळती अन तांत्रीक अडचणी
पाणी प्रश्नांसह माळमाथा व मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरण जलवाहिनीची वारंवार पाइपलाइन फुटणे, तांत्रिक बिघाड होणे, वीजपुरवठा खंडित होणे, पंपिंग यंत्रणेत अडचणी निर्माण होणे, पाणीपुरवठा नियंत्रण व देखभाल करण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसणे या बाबी विचारात घेऊन त्यावर ठोस निर्णय व्हायला हवा. विहिरी, पाणवठे, गाव तलाव, पाझर तलाव तसेच सार्वजनिक जलस्त्रोतांच्या परिसरातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यासह पाण्याची चोरी रोखण्यासाठी गाव पातळीवर समित्यांची गरज आहे.
चौकट
पाणीपुरवठा योजनेचे तांत्रिक ऑडिट गरजेचे
फुटणाऱ्या जलवाहिण्यांची दुरुस्तीची गरजेची
जलशुध्दीकरणासाठी अखंडित वीजेची गरज
पर्यायी जलस्रोत व पाणीसाठ्यांचे संवर्धन
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. जलस्रोतातून पाणी चोरीवर कडक व गांभीर्याने कारवाई अपेक्षित आहे. प्रशासनाने कुणाचाही मुलाहिजा न ठेवता तटस्थपणे प्रशासकीय भूमिका घ्यावी.
- आर.डी. निकम, माजी सरपंच,गुगुळवाड
--------
पाणीचोरीच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयातून तपासणी करून कारवाई सुरू केली आहे. अनधिकृतरीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील.
- विशाल सोनवणे, तहसीलदार, मालेगाव.