टुडे १ मेन फिचर
---
(पाण्याची नासाडी, नळ सुरू असलेले संग्रहित छायाचित्र वापरावे)
----
कुठे पाणीकपात, कुठे तीन ते पाच तास पुरवठा
दुष्काळात धोरणालाच हरताळ; दीक्षितवाडी, नवीपेठेसह विविध भागांत नासाडी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाघूर जलाशयातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जळगाव महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याच्या कालावधीत १५ मिनिटांची कपात केली आहे. दुसरीकडे, नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांच्याकडून केले जात आहे. मात्र, शहरातील काही भागांत तब्बल तीन ते पाच तास पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी शुक्रवारी (ता. २३) महापौरांकडे करण्यात आल्या. त्यामुळे एका बाजूला पाणी बचतीचे धोरण आणि दुसरीकडे पाण्याची होणारी नासाडी, अशी विसंगत स्थिती समोर आली आहे.
वाघूर जलाशयातील उपलब्ध पाणीसाठा आगामी काळातही पुरेसा ठरावा आणि शहराची पिण्याच्या पाण्याची गरज भागविता यावी, यासाठी महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारपासून (ता. १७) पाणीपुरवठ्याच्या निर्धारित कालावधीत १५ मिनिटांची कपात करण्यात आली. या निर्णयातून पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असताना, प्रत्यक्ष वितरण व्यवस्थेत मात्र एकसमानता नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
चौकट
या भागात पाणीपुरवठा अधिक वेळ
दीक्षितवाडी, नवीपेठ, बालाजीपेठ, शनिपेठ, बळीरामपेठ आणि हरिविठ्ठलनगर परिसरातील काही भागांत तीन ते चार तास पाणी सोडले जात असल्याचे नागरिकांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. दीक्षितवाडी येथे तब्बल पाच तास पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती एका नागरिकाने महापौरांना फोनद्वारे दिली. तसेच निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याची तक्रारही करण्यात आली. दुष्काळाच्या काळात पाणी बचतीसाठी नागरिकांना आवाहन केले जात असताना, वितरण व्यवस्थेतील अशा विसंगतीमुळे महापालिकेच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
चौकट
महापौर व्हॉल्वमनची घेणार बैठक
या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे सर्व व्हॉल्वमनची बैठक घेणार आहेत. शहरातील सर्व भागांत समान पद्धतीने पाणीपुरवठा होईल, निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ पाणी सोडले जाणार नाही आणि पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आवश्यक दक्षता घेतली जाईल, याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत.