Weather Update : अतिवृष्टीमुळे राज्यात १८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update farmer 18 lakh hectares area affected in state due heavy rains nashik

Weather Update : अतिवृष्टीमुळे राज्यात १८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित

नामपूर (जि.नाशिक) : यंदा जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस, पूर यामुळे १८ लाख २१ हजार हेक्टर जमीन बाधित झाली आहे. यामध्ये जिरायतीखालील १७ लाख ५९ हजार ६३३, बागायतीखालील २५ हजार ४७६ ,फळपीक ३६ हजार २९४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, यंदाच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी आगामी काळात पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहेत. मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे, अशा प्रकारची प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे.

यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (सॅटेलाइट इमेज) व ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. गोगलगायी, यलो मोझॅक, नाकतोडे, यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. पाऊस, हवामान विषयक बाबीचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी २ हजार ४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी नामपूर बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे यांनी केली आहे.

डिजिटल शेती अभियानामध्ये ड्रोन तंत्रज्ञान, नॅनो युरिया, सिंचन स्वयंचलितीकरण, नियंत्रित लागवड, ह्या तंत्रज्ञानाच्या वापरास शासनाने प्रोत्साहन द्यावे. जैविक शेती व नैसर्गिक शेतीसंदर्भात केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात.

-शैलेंद्र कापडणीस, कार्याध्यक्ष शेतकरी संघटना

जुलै २०२२ मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सुधारित दराप्रमाणे मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत प्रती हेक्टरी वाढीव मदत असून पूर्वी दोन हेक्टर मर्यादेत मदत केली जायची आता ती तीन हेक्टर इतकी वाढवली आहे. आपत्तीमध्ये तत्काळ देण्यात येणारी मदत ही पाच हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-एस. एस. पवार, तालुका कृषी अधिकारी, बागलाण, जि.नाशिक

Web Title: Weather Update Farmer 18 Lakh Hectares Area Affected In State Due Heavy Rains Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..