पान-१
------------
विवाह सुरू असताना लग्नमंडपात तुफान राडा
------------
डिझेल टाकत जाळण्याच्या धमकीचा मुलाकडच्यांचा आरोप, दोन्ही गटांत हाणामारी, १४ जण ताब्यात
-----------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २५ : घरातून दीड महिन्यांपूर्वी पळून जाऊन नोंदणी पद्धतीने विवाह केलेल्या युवक- युवतीचा रविवारी (ता.२५) शहरातील आसरा लॉन्स येथे मुलाच्या कुटुंबीयांनी वैदिक पद्धतीने विवाह समारंभ ठेवला होता. तेथे मुलीकडील नातेवाइकांनी येऊन विरोध केला. यातून जोरदार राडा होऊन दोन्ही बाजूंनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. मुलीच्या नातेवाइकांनी डिझेल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुलाच्या कुटुंबीयांनी दिली आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील १४ जणांना ताब्यात घेतले आहे.
येवला येथील पैठणी विणकाम करणाऱ्या कुटुंबातील वृषभ भगुंडे आणि रामपूर (ता. निफाड) येथील शिवानी बोरगुडे या तरुणीने ९ सप्टेंबरला नाशिक येथे नोंदणी करून विवाह केला आहे. मुलाकडच्यांनी रविवारी सकाळी हिंदू वैदिक पद्धतीने विवाह आयोजित केला होता. यावेळी मुलीचे नातेवाईक या ठिकाणी आले. सुरवातीला शाब्दिक चकमक झाल्यानंतर वाद अधिकच चिघळला आणि दोन्ही गटांतील व्यक्ती आमनेसामने आल्या. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विवाह सोहळ्याच्या ठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, या प्रकरणी १४ जणांना ताब्यात घेतले आहे. संशयितांचा शोध सुरू आहे.
लॉन्सवर लहान मुले, महिला आणि उपस्थितांवर ज्वलनशील पदार्थाने हल्ला झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक संदीप मंडलीक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
या संदर्भात मुलाचा भाऊ शुभम भगुंडे यांनी शहर पोलिस ठाण्यात रवींद्र बोरगुडे, सुरेखा बोरगुडे, सार्थक बोरगुडे, विजया शिंदे, निखिल रायते, अक्षय तिडके, सोमा बोरगुडे, संजय बोरगुडे, रावबा बोरगुडे, खंडेराव तिडके, लक्ष्मण शेजवळ (सर्व रा. रामपूर, पो. नैताळे, ता. निफाड) यांच्यासह १५ जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
१६-१
पेटवून द्या सांगत मारहाण
वृषभ व शिवानी यांच्या विवाहासाठी आम्ही जमलो असता या पंधरा जणांनी प्लास्टिकच्या कॅनमध्ये रॉकेल व डिझेल घेऊन आमच्यावर ओतले तसेच लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेऊन जोरात ओरडत यांना पेटवून द्या, जिवंत सोडू नका म्हणून मारहाण केली. काही महिलांच्या व पुरुषांवरही अंगावर रॉकेल ओतून मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
१६-१
मुलाकडच्यांकडून संपविण्याची धमकी
दुसऱ्या गटातर्फे सुरेखा बोरगुडे यांनी ऋषभची आई रोहिणी भंगुडे, शुभम भंगुडे, मयूर भंगुडे, अनिल भंगुडे, रवी पवार, भैया लाडे या सर्वांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्या मुलीने ऋषभ यांच्याशी प्रेम विवाह केला असून ती मागील काही दिवसापासून घरून निघून जाऊन ऋषभ यांच्याकडेच राहते. आज या दोघांचे लग्न असल्याने आम्ही तिला बघण्यासाठी आलो असता मुलाच्या नातेवाइकांनी वाद घालून मारहाण केली तसेच लाकडी दांड्याने, लोखंडी रॉड व चाकूने मारहाण करून तलवार उगारून एकेकाला संपून टाकीन असा दम दिल्याचे म्हटले आहे. यात सोन्याची पोत व अंगठी गहाळ करून नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दोन्ही गटांच्या फिर्यादी दाखल करून घेत पोलिसांनी रामपूर येथील नऊ तर येवल्यातील चार जणांना ताब्यात घेतले आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, साहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, हवालदार पाटोळे आदी तपास करत आहेत.
-----------------