शेअर बाजारात व्हॉट्सॲपवरून ‘पंप ॲन्ड डंप’ फ्रॉड
‘ईडी’चे नाशिकसह सहा शहरांत छापासत्र; २०० कोटींची खाती गोठवली
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : शेअर बाजारात व्हॉट्सॲप ग्रुप्सचा गैरवापर करून ‘पंप ॲन्ड डंप’ योजनेद्वारे किरकोळ गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ‘ईडी’च्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने नाशिकसह मुंबई, अहमदाबाद, गांधीनगर, सुरत आणि भावनगर या सहा शहरांतील तब्बल २९ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत सुमारे २०० कोटी रुपयांचे ट्रेडिंग अकाउंट्स गोठविण्यात आले असून, अनेक संशयास्पद कागदपत्रे व डिजिटल साधने जप्त करण्यात आली आहेत.
‘ईडी’ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आर. एम. ड्रिप ॲन्ड स्प्रिंकलर्स सिस्टीम्स लि. आणि आरॲडबी डेनिम्स लि. या दोन सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअरमध्ये फेरफार करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान ‘ईडी’ने कंपन्यांची कार्यालये, प्रवर्तकांची निवासस्थाने, शेअर ब्रोकिंग आणि फायनान्स कंपन्यांची कार्यालये, तसेच व्हॉट्सॲपवरून खोट्या टिप्स पसरविणाऱ्या संशयितांच्या ठिकाणांची झाडाझडती घेतली.
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान या कंपन्यांनी ३.५ कोटींहून अधिक शेअर आणि कन्व्हर्टिबल वॉरंट्स अत्यंत कमी दरात ठराविक लोकांना व संस्थांना दिले. यासाठी लागणारा बहुतांश पैसाही याच नेटवर्कमधील घटकांनी पुरविला होता. डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ यांसारख्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवरून किरकोळ गुंतवणूकदारांना हे शेअर खरेदीचे मेसेज पाठविले गेले. हे ग्रुप्स हरियाना आणि मुंबईतील व्यक्तींच्या नावे घेतलेल्या सिमकार्डवर चालविले जात होते; तर त्यांचे संचालन गुजरातच्या भावनगरमधून होत होते.
व्हॉट्सॲप, एक्स आणि ‘एसएमएस’द्वारे जाहिरातबाजी करून शेअरचे भाव कृत्रिमरीत्या प्रचंड वाढविण्यात आले. भाव वाढताच सुरुवातीला स्वस्तात शेअर मिळविलेल्या प्रवर्तक व मध्यस्थांनी स्वतःकडील शेअर चढ्या दराने विक्री करून लाखो रुपयांचा नफा कमावला आणि किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
तपासात काय आढळले?
‘ईडी’च्या तपासात ‘ॲफ्लुएन्स जेम्स,’ ‘कावा एचयूएफ’ आणि ‘कोमले कन्सल्टन्सी’ यांसारख्या कौटुंबिक संबंध असलेल्या लाभार्थी संस्थांची नावे समोर आली आहेत. छापेमारीदरम्यान विविध आक्षेपार्ह दस्तावेज, डिजिटल उपकरणे, शेअरच्या व्यवहारांची नोंद पुस्तके आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे ‘ईडी’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.