esakal | नांदगाव : सबवेचा पहिला बळी; रेल्वेखाली सापडून भाविक महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

woman dies while crossing railway line at nandgaon nashik accident news

नांदगाव : सबवेचा पहिला बळी; रेल्वेखाली सापडून भाविक महिला ठार

sakal_logo
By
संजिव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : येथील मध्य रेल्वेच्या सबवेत साचलेल्या पाण्यामुळे रुळावरुन जाणे एका भाविक महिलेला महागात पडले. नवरात्री निमित्ताने ग्रामदेवता एकविरा मातेच्या मंदीरात जाणारी पंचवीस वर्षीय विवाहिता रेल्वेगाडी खाली सापडून ठार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

सबवेमध्ये साचलेलेल्या पाण्याचा उपसा होत नसल्यामुळे सध्या सबवेत पाणी आहे .तुंबलेल्या पाण्यातून जाता येत नसल्यामुळे रेल्वे क्रासिंग करावे लागत आहे. आज पहाटे सहा वाजता स्वाती रवी शिंदे (२५) ही महिला शेजारी राहणाऱ्या सुवर्णा मोरे या महिलेसह तीन मुलींना सोबत घेवून रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेली महिला भुसावळकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसखाली सापडली. सुदैवाने सुवर्णा व अन्य तीघे मुली मात्र बालंबाल बचावल्या.

नगरसेकाच्या समोरच घडला प्रकार

याच सुमाराला नगरसेवक नितीन जाधव हेही मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात असतांना त्यांच्या पुढ्यातच हा आपघात घडल्याने त्यांनी आरडाओरड केली. रुळ ओलांडून जाणाऱ्या या महिलांना सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वाती शिंंदे या महिलेला वाचविता आले नाही. मुली महिलांचा आक्रोश काळीज हेलावून टाकणारा होता. नितीन जाधव यांनी भयभयीत झालेल्या मुलींना धिर दिला व त्यांच्या कडून मिळालेल्या फोनक्रमांकावर फोन केला असता या महिला रेल्वे वसाहतीमागील नव्या वस्तीत राहणाऱ्या असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा: विमा कंपनीच्या नफेखोरीत अन्नदाता बेदखल

नितीन जाधव यांनी सांगीतले की…

आज सकाळी नागपूरने मुंबईला जान्या साठी निघालो असता अत्यंत दुर्दैवी अशी घटना माझ्या समोर घडली सुमारे साडेपाच वाजता लक्ष्मी टॉकीज जवळील पुल ओलांडून पुढे जाता जाता मुंबई वरून येणाऱ्या गाडीला सिग्नल होता आणि माझ्या बाजूने देखील मालगाडी जात होती मी पुढे गेलो आणि गाडी संपली तितक्यात मुंबई वरून गाडी पुलापर्यंत आली लहान तीन मुल घेऊन दोन बायका घाईत निघतांना दिसल्या मी जोरात ओरडलो पण तो पर्यंत दुर्लक्ष करून रुळ ओलांडला. सर्वांनी घाबरून रुळ ओलांडला खरा पण शेवट असलेली महिला गाडीखाली खेचल्या गेली. गाडी गेल्यानंतर पाहिले तर ती क्षणात जीव सोडून गेलेली होती. मुलींचा आई आई म्हणून ओरड झाला त्यांना शांत करून त्यांच्या कडून मोबाईल नंबर घेतला आणि फोन करून सांगितलं तेव्हा समजले की, आपल्याच भागात राहणारा गरीब होतकरू राजू शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या तो येई पर्यंत तिथेच थांबलो तो आल्या नंतर एकच टाहो फुटला मला त्यांना सावरणे कठीण झाले कसा बसा तेथून त्यांना सांगून निघालो GRP नांदगाव यांना निरोप देण्यासाठी निरोप आधीच मिळाला होता आणि त्यांना परिस्थीती रस्त्यातच सांगितली आणि ते पुढे पोहोचले रेल्वे सबवे मध्ये पाणी नसते तर ती महिला आज जिवंत असती…

हेही वाचा: नाशिक : चांदवड तालुक्याला अवकाळी पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी तडाखा

जबाबदारी घेत दिला राजिनामा

मी नितीन दयाराम जाधव प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व नागरिकांचा मी ऋनी आहे आणि राहील आपण मला कुठल्याही प्रकारचे अपेक्षा न ठेवता एका कार्यकर्त्याला प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून दिले परंतु मी एक नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागाच्या अडचणी दूर करू शकलो नाही आणि असा अकार्यक्षम नगरसेवक म्हणून प्रभागातील नागरिकांनी मला उभे सुधा केले नाही पाहिजे असे मला वाटते. वेळीच सबवे बद्दल लक्ष दिले असते तर आज एक निरपराध जीव गेला नसता. ही घटना पहिली जरी असली तरी शेवटची नाही, या सर्व गोष्टीचा मी आपराधी आहे असे मला वाटते आता जास्त मुक राहणे नाही जमत, या सर्व गोष्टींचा मी जबाबदार आहे असे मला वाटते म्हणून नगरसेवक पदाचा जाहीर राजीनामा देत आहे असे नितीन जाधव यांनी सांगितले.

दरम्यान सबवेतील पाण्याचा निचरा होण्यासाठी पालीका व रेल्वे यांच्या तील टोलवाटोलवी एवढा बाका प्रसंग घडल्यावरही कायम होती.

loading image
go to top