पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा
-----------------------------------
चारित्र्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीचे वार करुन केला होता खून
सकाळ वृत्तसेवा
सटाणा ता.७ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर कुऱ्हाडीने वार करत निर्घृण खून करणाऱ्या पतीला मालेगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे, या खटल्यात अवघ्या पाच वर्षांच्या मुलाने दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. हिरामण काळू वाघ (वय ४५, रा. लोहोणेर, ता. देवळा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
लोहोणेर (ता. देवळा) येथे २ मार्च २०२१ ला दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली होती. तसा गुन्हा सटाणा पोलिसात दाखल झाला होता. संशयित आरोपी हिरामण वाघ हा पत्नी संगीता हिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार तिच्याशी वाद घालत होता. याच संशयातून त्याने पत्नीशी भांडण केले. त्यानंतर घरातील कुऱ्हाडीने तिच्या डोक्यावर वार करून तिचा खून केला. या घटनेनंतर आरोपीने मृत पत्नीचा मुलगा अजय हिरामण वाघ याला प्रत्यक्ष घटनेची माहिती शेजारी व अन्य नातेवाइकांना देण्यास सांगितले. मात्र, घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या अवघ्या पाच वर्षांच्या अजयने न्यायालयात दिलेली साक्ष खटल्याच्या दृष्टीने निर्णायक ठरली.
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी तपास करून मालेगाव येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड अशोक एन. पगारे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यात प्रत्यक्षदर्शी बालसाक्षीदार अजय वाघ याची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने निकाल दिला.
न्यायाधीश एम. ए. भोसले यांनी ६ नोव्हेंबर २०२६ ला निकाल जाहीर करत आरोपी हिरामण वाघ याला दोषी ठरवून जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षाही ठोठावण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षाला ॲड संजय सोनवणे यांनी सहकार्य केले. कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार तुळशीराम खंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.