नाशिक- गोल्फ हा खेळ श्रीमंतांसाठी आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र, विंग कमांडर प्रदीप बागमार यांनी निफाड येथे स्वतःच्या जागेत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत गोल्फ शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. कधी स्वप्नातही हा खेळ खेळायला मिळेल, असे या मुलांना वाटले नव्हते. मात्र, काही कालावधीतच फक्त टीव्ही आणि मोबाईलवर पाहिलेल्या गोल्फ खेळात शाळकरी मुले पारंगत झाली. तसेच, नागरिकांमध्येही या खेळाबद्दल आकर्षण निर्माण होत आहे. रोज नाशिक शहरातून जवळपास ४० हून अधिक नागरिक गोल्फ खेळण्यासाठी रिव्हर साइड गोल्फ कोर्स येथे जात आहेत.