Winter Cold : उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम; निफाडमध्ये पाच अन् जळगावमध्ये 5.3 अंश सेल्सिअसची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter cold

Winter Cold : उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम; निफाडमध्ये पाच अन् जळगावमध्ये 5.3 अंश सेल्सिअसची नोंद

नाशिक/निफाड : उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१०) कायम राहिली. दिवसभर हुडहुडी भरवणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर करावा लागला. निफाडमध्ये दुसऱ्या दिवशी पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

जळगावचा पारा पाच वरून ५.३ अंश सेल्सिअसवर पोचला. त्याचवेळी गेल्या ४८ तासांत नाशिकचे किमान तापमान निम्म्याने घसरून आज ७.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. तसेच २४ तासांत नंदुरबारमध्ये पारा २.५ अंश सेल्सिअसने घसरला आणि आज इथे ७.६ अंश सेल्सिअस तापमान राहिले.

हेही वाचा: Winter Health Care : हिवाळ्यात जास्त पाणी पिता? सावधान, ओढावू शकतो मृत्यू

नाशिकमध्ये रविवारी (ता. ८) १३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. सोमवारी (ता. ९) ८.७ अंश सेल्सिअस तापमान राहिले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजूनही २४ तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी थंडीची लाट ते शीतलहर राहण्याची शक्यता आहे. निफाडमध्ये यंदाचे सर्वांत कमी तापमान राहिले आहे.

१० डिसेंबर २०२२ ला ६.३ अंश सेल्सिअस किमान तापमान राहिल्याने निफाड तालुका थंडीने गारठला होता. त्यानंतर मात्र निफाड तालुक्यात तापमानात चढ-उतार सातत्याने सुरू होते. गेल्या तीन-चार दिवसांत ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांत चिंता पसरली होती.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

निफाडमध्ये कडाक्याच्या थंडीने सकाळी जनजीवन विस्कळित झाले होते. सकाळी रस्त्यावर वाहनांची गर्दी कमी होती. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेकोट्या पेटविल्या होत्या. घसरलेल्या पारामुळे रब्बीमधील गहू, हरभरा, कांदा पिकासाठी फायदा होणार आहे. दुसरीकडे मात्र दिंडोरी, निफाड, नाशिक तालुक्यांत द्राक्षबागांचा हंगाम सुरू होण्याच्या टप्प्यावर असल्याने थंडी द्राक्षबागांच्या मुळावर येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

द्राक्षबागा फुलोरा अवस्थेकडून मणी सेटिंग व परिपक्व होण्याच्या अवस्थेत पोचल्या आहेत. थंडीमुळे तयार झालेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका आहे. या अवस्थेत द्राक्षबागेतील घडांच्या मण्यांमध्ये गोडवा निर्माण होत असतो. त्यातच तापमान घसरल्याने द्राक्षमण्यांना तडे जाऊन द्राक्षांचे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे.

हेही वाचा: थंडीने बाप्पाही कुडकुडला; भक्तांच्या आग्रहाने स्वेटर घातला | Winter Season

किमान तापमानाची नोंद

(आकडे अंश सेल्सिअसमध्ये)

- औरंगाबाद- ७.७

- पुणे- ७.४

- राहुरी- ८.१

- नगर- ८.५

हेही वाचा: Winter Cold : उत्तर महाराष्ट्रात वाढणार हुडहुडी; थंडीच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट

''तडे गेलेल्या द्राक्ष मण्यांची विरळणी करण्याचा खर्च वाढणार आहे. कडाक्याच्या थंडीत द्राक्षबागांमध्ये पहाटेच्या वेळी पाणी देणे, शेकोटी पेटवून धूर करणे असे उपाय शेतकऱ्यांना करावे लागत आहेत.'' - ॲड. रामनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघ