esakal | उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसुती, कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण अधोरेखित
sakal

बोलून बातमी शोधा

woman gave birth at the entrance of the sub-district hospital Niphad

उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसुती, कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण अधोरेखित

sakal_logo
By
रोहित कणसे

निफाड (जि. नाशिक) : एकीकडे ग्रामीण रुग्णालयांना कोविड केअर सेंटरचा दर्जा दिला जात असताना दुसरीकडे मात्र सामान्य रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी येत आहे. निफाड उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरु असल्याने प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसुती झाल्याचा प्रकार बुधवारी (ता.१४) घडला. या प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण अधोरेखित होतो.

निफाड येथील उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटर झाले आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास एका गरीब कुटुंबातील गरोदर शेतमजूर महिलेला बाळंतपणासाठी तिचे नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आले. परंतु, हे रुग्णालय कोविड आरोग्य केंद्र म्हणून शासनाने अधिग्रहित केल्यामुळे या ठिकाणी इतर कोणत्याही रुग्णाला प्रवेश दिला जात नाही.

प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतूक

रुग्णालयात प्रवेश मिळत नसताना अचानक या महिलेस रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे सर्वांची एकच धावपळ उडाली. या सर्व गोंधळाची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने रूग्णालयातील परिचारिका वैशाली नागरे यांच्यासह प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. ज्या वाहनातून या महिलेला आणण्यात आले होते त्याच वाहनात डॉ. पाटील आणि परिचारिका नागरे यांनी तातडीने आपले सर्व कौशल्य पणाला लावून महिलेची सुखरूप सुटका केली. बाळ व बाळंतिणीची सुखरूप सुटका झाल्याने सर्वांनी आनंद साजरा केला. निफाड उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पाटील, परिचारिका नागरे आणि सर्व सहकाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतूक होत आहे.