
‘उज्ज्वला’ लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान मिळणार
साल्हेर (नाशिक) : केंद्र सरकारने पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत प्रत्येक गॅस सिलिंडरवर अनुदानाची घोषणा केली आहे. केंद्राच्या वतीने प्रत्येक सिलिंडरमागे २०० रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उज्वला गॅस योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. मात्र, कोरोनाकाळात उज्वला गॅस योजनेची सबसिडी बंद झाली होती. त्यामुळे ‘गॅसचा भडका अन् चुलीवर स्वयंपाकाचा तडका’ अशी म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील आदिवासी महिलांवर आल्याचे वृत्त सकाळने प्रसिद्ध केले होते. उज्वला गॅस सिलिंडरची सबसिडी मिळत नसल्याने यासंदर्भात भाजप नाशिक ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश घोडे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांच्याकडे सबसिडी मिळावी, यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली होती. २०० रुपये मिळावे, यासाठी श्री. घोडे यांनी पत्रव्यवहार देखील केला होता. अखेर दोनशे रुपये खात्यावर जमा झाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
"ज्या गॅस एजन्सीत नोंदणी झालेली आहे त्याच ठिकाणाहून सिलिंडर घेतल्यानंतरच ग्राहकाच्या खात्यावर २०० रुपये अनुदान जमा होईल. गेल्या कित्येक दिवसांपासून अनुदान बंद होते. यासंदर्भात खासदार सुभाष भामरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे."
- राकेश घोडे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप
"पंतप्रधान उज्वला गॅस योजनेचे अनुदान कोरोनाकाळात केंद्र सरकारने बंद केले होते. त्याच दरम्यान सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे गृहिणींचे बजट चुकले होते. सरकारने सबसिडी सुरू केल्याने समाधान वाटते."
- पुजा अहिरे, गृहिणी, किकवारी बुद्रुक