धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 33658
धुळे : विद्यावर्धिनी महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीच्या बैठकीवेळी उपस्थित पदाधिकारी, सदस्या.
--
कामाच्या ठिकाणी महिलांचा आत्मसन्मान जपणे गरजेचे
--
प्रा. डॉ. वैशाली पाटील : ‘विद्यावर्धिनी’त महिला तक्रार निवारण समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : कामाच्या ठिकाणी महिलांना अपमानास्पद वागणूक देणे, सार्वजनिक ठिकाणी ओरडून बोलणे, अवमानकारक टिप्पणी करणे, अश्लील वक्तव्य करणे किंवा लैंगिक स्वरूपाचे शेरे मारून मानसिक त्रास देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा आत्मसन्मान जपणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. वैशाली पाटील यांनी केले. महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीच्या बैठकीत त्या मार्गदर्शन करत होत्या.
समिती सदस्या डॉ. मंजु तरडेजा, डॉ. नेहा पाठक, प्रा. अर्चना वळवी, प्रा. उज्ज्वला वाणी, डॉ. भारती लाडकर, प्रा. बबिता वाडिले, प्रा. दीपाली पाटील, प्रा. वैशाली बोरसे, प्रा. श्वेता पाटकरी, प्रा. वैशाली चिंतामणी यांच्यासह महाविद्यालयातील महिला प्राध्यापक उपस्थित होत्या. यावेळी प्रा. पाटील यांनी महिलांना पॉश ॲक्ट २०१३ चे अधिकार व मर्यादा याविषयी मार्गदर्शन केले. अशा वर्तनामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचू शकतो तसेच त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि कामाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे सांगत त्यांनी कायद्यानुसार यावर योग्य कार्यवाही होऊ शकते याची जाणीव करून दिली.
कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ सिद्ध झाल्यास पॉश कायद्याच्या कलम १३ नुसार अंतर्गत समितीला संबंधित सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार आहेत. यात परिस्थितीनुसार लेखी माफी, समुपदेशन, ताकीद देणे, पदोन्नती किंवा वेतनवाढ रोखणे, तसेच सेवेतून काढणे यांसारख्या कारवाया लागू सेवा नियमांनुसार होऊ शकतात. तसेच, जर महिलेची तक्रार खोटी असेल, तर तिच्या विरोधातही शिस्तभंगाची कारवाई होते. याची जाणीव ठेवून प्रत्येक महिलेने आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी, असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले.